" थोड्या' साठी डाग लावून घेऊ नका, "व्हीप' नुसार मतदान करा - एकनाथ शिंदे

 " थोड्या' साठी डाग लावून घेऊ नका, "व्हीप' नुसार मतदान करा - एकनाथ शिंदे

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असून, मतदान गोपनीय असले तरी नंतर कोणी कोणाला मतदान केले हे उघड होतच असते. त्यामुळे थोड्याशा गोष्टींसाठी डाग लावून घेऊ नका, कोणाच्या संपर्कात राहू नका, पक्षाच्या व्हीपनुसार मतदान करा, असे आवाहन गुरुवारी (ता. एक) शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांना नेत्यांनी केले. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात युतीच्या मतदार असलेल्या सदस्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री शिंदे यांनी "अनेकांनी उमेदवारी मागितली होती. इच्छा व्यक्त करणे गैर नाही; मात्र एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी एकदिलाने काम करावे. प्रत्येकाने सावध राहून, व्हीपप्रमाणे मतदान करावे. स्वतः वर डाग लावून घेऊ नये' असे आवाहन उपस्थितीत मतदार सदस्यांना केले. 

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मतदानात जालना जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल असा दावा करतांनाच ही निवडणूक संशय घेणारी आहे. त्यामुळे विरोधकांशी बोलू नका. तुमचे राजकीय करिअर धोक्‍यात आणू नका असे आवाहन केले. 

अंबादास गरीब उमेदवार 
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम आहे. हिरवा रंग उधळणारे म्हणतात, सहा ठिकाणी विजय मिळवू, महापालिका ताब्यात घेऊ, आपण एकजूट दाखविली पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत युतीला जिल्ह्यातील नऊपैकी नऊ जागा जिंकायच्या आहेत. अंबादास दानवे व माझ्यात कुठलेही भांडण नाही; पण अंबादास गरीब आहे, त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका असे स्पष्ट केले. 

व्हीप न पाळल्यामुळे कर्नाटकात नुकतेच 22 आमदारांचे निलंबन झाले आहे हे विसरू नका. या निवडणुकीत कोणी गडबड केली तर पुढच्या सभागृहात ते दिसणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी यावेळी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com