'एमएलसी'साठी शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी? भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुष्यंत चतुर्वेदी यांचे नावाची शिफारसच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून झाल्याने त्यांचेच नाव निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्‍यता आहे
Dushyant Chaturvedi may get Shivsena Ticket for Council Election
Dushyant Chaturvedi may get Shivsena Ticket for Council Election

यवतमाळ  : यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झाली नसली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नागपूरचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांचे नाव शिवसेनेच्या कोट्यातून जवळपास निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू असले तरी उमेदवारांच्या महत्त्वाकांक्षेमुळे निवडणूक लढली जाईल, असे चित्र दिसत आहे.

यवतमाळ विधान परिषद मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. या मतदारसंघाचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी ३१ जानेवारीला निवडणूक होत आहे. मंगळवार, ता. १४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. आतापर्यंत ३४ पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. त्यात माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया, त्यांचे बंधू कंत्राटदार सुमीत बाजोरिया, सौ. शीतल संजय राठोड, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, वर्धेचे व्यापारी शरद सराफ, कंत्राटदार रमेश गिरोलकर, वणीचे संजय देरकर आदींची नावे आहेत. 

शिवसेनेचा उमेदवार हा मातोश्रीवर ठरणार असल्याने सर्वांच्या नजरा मातोश्रीकडे लागल्या आहेत. विदर्भात शिवसेनेला भक्कम करण्यासाठी यवतमाळ विधान परिषदेच्या जागेवर नागपुरातील उमेदवार दिला जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री सतीश चर्तुर्वेदी यांच्या नावावर चर्चा झाली. आर्णी येथे शनिवारी (ता.११) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भाने चर्चा झाली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुष्यंत चतुर्वेदी यांचे नावाची शिफारसच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून झाल्याने त्यांचेच नाव निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडीला जागा सुटल्यास शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी लढण्याची शक्‍यता आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला असून माजी आमदार संदीप बाजोरिया आणि त्यांचे बंधू सुमीत बाजोरिया यांनीही निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे. 

कंत्राटदार सुमीत बाजोरिया यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी त्यांना भाजपमधील एका माजी मंत्र्यांचे पाठबळ असून विद्यमान पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे त्यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्यास अखेरच्या क्षणी भाजपकडूनही उमेदवारी मिळविण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेकडे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनीही उमेदवारी मागितली आहे. अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मात्र दुष्यंत चतुर्वेदी यांचे नाव मात्र निश्‍चित समजले जात आहे.

भाजप म्हणतो १४ तारखेची प्रतीक्षा करा

उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख १४ जानेवारी ही आहे. भाजपकडून अद्याप कुणाचेही नाव निश्‍चित नाही. कंत्राटदार सुमित बाजोरिया यांच्याही नावावर भाजप विचार करू शकते. नागपूरचे काही उद्योजकही भाजपकडून लढण्यात इच्छुक आहेत. परंतु, उमेदवार कोण असेल याबाबत १४ तारखेची प्रतीक्षा करावी लागेल, असे सूचक उद्‌गार भाजप नेते व माजी पालकमंत्री मदन येरावार यांनी काढले. त्यामुळे निवडणुकीचे चित्र १४ जानेवारीलाच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com