Drones to keep Watch on Malegaon Elections | Sarkarnama

मालेगावात चार ड्रोनद्वारे हवाई टेहळणी - राज्यात पहिल्यांदा निवडणुकीत ड्रोनचा वापर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

निवडणुकीवर ड्रोनमार्फत नजर ठेवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुरेसे पोलिस बळ असतानाही ड्रोनचा वापर केला आहे. ते निश्‍चितच लाभदायी ठरेल. -अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

नाशिक - मालेगाव महापालिकेची निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी व शहरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अडीच हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह चार ड्रोनचीही करडी नजर राहणार आहे. कोणत्याही निवडणुकीच्या काळात राज्यात पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

मालेगाव महापालिकेसाठी येत्या बुधवारी (ता. 24) मतदान होत असून, 84 जागांसाठी 374 उमेदवार रिंगणात आहेत. नाशिक परिक्षेत्रातील नगर, नाशिक, धुळे, जळगावसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मालेगाव येथे मतदान व मतमोजणीदरम्यान बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अपर पोलिस अधीक्षक, स्थानिक तीन पोलिस उपअधीक्षकांसह 13 पोलिस उपअधीक्षक, 40 पोलिस निरीक्षक, 105 उपनिरीक्षकांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

मालेगाव शहरातील पूर्व भागात सुरक्षेकडे लक्ष देण्यात आलेले आहे. अरुंद रस्ते, मतदारांची संख्या अधिक आणि एका शाळेच्या आवारात अधिक मतदान केंद्रे, यामुळे अशा ठिकाणी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. चारही ड्रोन गर्दीच्या ठिकाणी सतत फेऱ्या मारत राहणार असून, पोलिस नियंत्रण कक्षामध्ये मतदान केंद्रावरील गर्दीची माहिती क्षणाक्षणाला मिळत राहील.

वीस गुंड तडीपार
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या 20 जणांना तडीपार केले आहे. यातील शहरातच आढळून आलेल्या पाच जणांना अटक केली असून, काहींनी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरही जे आढळून येतील त्यांच्यावर पोलिस कारवाईचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. तसेच सुमारे 500 जणांवर पोलिस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

निवडणुकीसाठीचा पोलिस बंदोबस्त
पोलिस अधीक्षक - 1
अपर अधीक्षक - 1
पोलिस उपअधीक्षक - 13
पोलिस निरीक्षक - 40
पोलिस उपनिरीक्षक 105
पोलिस कर्मचारी - 1700
होमगार्ड - 500
एसआरपी - 3 कंपन्या
शीघ्र कृती दल - 6 प्लाटून

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख