डॉ. रामास्वामी म्हणजे दुसरे डॉ. मुंढेच

डॉ. रामास्वामी म्हणजे दुसरे डॉ. मुंढेच

 मुंबई, ता. २५ : नवी मुंबई महानगरपालिकेचे डॅशिंग आयुक्त डॉ. तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी झाल्याने त्या ठिकाणी येणा-या डॉ. रामास्वामी एन. हे आयुक्तपदाची सूत्रे हाती घेत आहेत. डॉ. रामास्वामी यांची ख्यातकिर्त सुद्धा `कर्तव्यकठोर` अशीच आहे. कर्तव्यकठोर कार्यपद्धतीला नम्रता व विनयतेचीही जोड हा डॉ. रामास्वामी यांच्या कार्यपद्धतीमधील वेगळा पैलू आहे. त्यामुळे डॉ. रामास्वामी म्हणजे दुसरे डॉ. मुंढेच असल्याचे बोलले जात आहे.

बुलढाणा व सातारा येथे जिल्हाधिकारी, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी, तर विक्रीकर सहआयुक्त अशा पदांवर डॉ. रामास्वामी यांनी अतिशय प्रभावी काम केले आहे. पुनर्रचना मंडळामध्ये असताना त्यांनी विकासकांच्या गैरकृत्यांना अंकुश लावला होता. घुसखोरांनी व बिल्डरांनी घशात घातलेली जवळपास ३००० घरे ताब्यात घेण्याची प्रक्रिया रामास्वामी यांनी कठोरपणे राबविण्यास सुरूवात केली होती. पण त्यांच्या या कामाचा विकसकांनी इतका धसका घेतला की, त्यांची तिथून अल्पावधीतच बदली करण्यात आली.

साता-याचे जिल्हाधिकारी म्हणून तेथील दुष्काळी भागात त्यांनी जलसंधारणाची भरपूर कामे केली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी जलयुक्त शिवारअभियान ही योजनाही कार्यान्वित नव्हती. 
पण जलयुक्त शिवार अभियानासारखेच प्रभावी काम त्यांनी सातारा जिल्ह्यात केले होते. त्यांच्या पुढाकाराने साता-यातील माण – खटाव तालुक्यात साखळी सिमेंट बंधा-यांची योजनाराबविण्यात आली होती. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रामास्वामी यांची ही योजना डोक्यावर घेऊन राज्यभरात त्याची अंमलबजावणी केली होती.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या कामामुळे रामास्वामी हे प्रभावशाली व कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून नावारूपाला आले. विक्रिकर सहआयुक्त म्हणूनही त्यांनी गैरकृत्ये करणारे व्यापारी, ठेकेदार यांच्यावरदंडुका उगारला होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. मुंढे यांच्या ताकदीचेच काम डॉ. रामास्वामी करतील, असे त्यांच्या कार्यपद्धतीवरून लक्षात येते. परंतु मुंडे यांची जशी तडकाफडकी बदली झाली तशी डॉ. रामास्वामी यांचीही होऊ शकते. शिवाय कर्तव्यकठोरपणामुळे डॉ. रामास्वामी यांनाही या आधी कोणत्याच पदावर फार काळ टिकू दिलेले नाही. त्यामुळे डॉ. रामास्वामी यांनाही भविष्यात डॉ. मुंडे यांच्याप्रमाणेच राजकीय पक्षांच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल, असे बोलले जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com