महाडिकांचे जसे झाले तसे डॉ. बाभूळकरांचेही होवू शकते!

नेत्यांचे मतभेद मिटतील पणकार्यकर्त्यांची तुटलेली मने जुळतील का ?
महाडिकांचे जसे झाले तसे डॉ. बाभूळकरांचेही होवू शकते!

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिती बाभूळकर यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशात अडथळेच जास्त आहेत.

या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी हे मान्य नाही तर ज्यांनी आयुष्यभर कै. बाबासाहेब कुपेकर यांना विरोध केला तेच लोक आज भाजपात आहेत. "सासुसाठी भांडण केले आणि सासुच वाट्याला' अशी गत भाजपातील कुपेकर विरोधकांची होणार आहे, त्यातून त्यांचाही या प्रवेशाला छुपा विरोधच असल्याचे समजते. 

या मतदार संघाच्या विद्यमान आमदार व कै. कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांनी यावेळची विधानसभा न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून त्यांच्या कन्या सौ. नंदिती बाभूळकर यांचे नांव पुढे आले असून त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 

डॉ. बाभूळकर यांच्यासोबत भाजपात प्रवेशाला मतदार संघातील राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची मानसिकता नाही. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांची ओळख आहे. श्री. मुश्रीफ जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत आणि या मतदार संघातील साखर कारखाना, बाजार समितीसह सहकारी संस्थांवर त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या दुसऱ्या फळीचा डॉ. बाभूळकर यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कुपेकर कुटुंबिय यांचे घनिष्ट संबंध आहेत. या जोरावरच राज्याच्या राजकारणात कै. कुपेकर यांना नेहमीच श्री. पवार यांनी झुकते माप दिले आहे. किंबहुना राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कै. कुपेकर यांनाच श्री. पवार यांनी जिल्हाध्यक्षपद दिले. हा मतदार संघ म्हणजे कुपेकर असे समीकरण असल्याने कार्यकर्त्यांतच भाजपा प्रवेशाबाबत उत्साह नाही. 

दुसरीकडे या मतदार संघात कै. कुपेकर यांच्याशी वर्षानुवर्षे राजकीय संघर्ष केलेले नेते
भाजपात आहेत. त्यात माजी मंत्री भरमू पाटील, गोपाळराव पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉ. हेमंत कोलेकर हे भाजपाचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांचे वडील व कै. कुपेकर यांच्यातील संघर्षातून मोठे वाद झाले, काहींना कारागृहात जावे लागले. या पार्श्‍वभुमीवर ही मंडळी डॉ. बाभूळकर यांचा भाजपा प्रवेश स्विकारतील का याविषयी साशंकता आहे. त्यातूनही नेत्यांचे मतभेद मिटतील पण कार्यकर्त्यांची तुटलेली मने जुळतील का ? हा प्रश्‍न आहे. किंबहुना लोकसभेला नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते दुसरीकडे हे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी जे अनुभवले त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com