चांदवडमध्ये भाजपच्या आमदार राहुल आहेरांना भाजपच्या डॉ. कुंभार्डेंचाच अडथळा? 

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या डॉ. भारती पवार यांना सर्वाधीक ऐंशी हजार मतांची आघाडी चांदवड विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. त्यामुळे विधासभेसाठी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साह आहे. मात्र येथील राजकारण देवळा आणि चांदवड या दोन तालुक्‍यांतील भौगोलीकतेभोवती फिरत असते. अशा स्थितीत चांदवडचे इच्छुक एका झेंड्याखाली आल्यास लोकसभेतील भाजपसाठी अनुकूल वातावरण प्रतिकूल होणार काय याची जोरदार चर्चा व हालचाली राजकीय नेत्यांनी सुरु केल्याने भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर त्याला कसे उत्तर देणार याची उत्सुकता आहे.
चांदवडमध्ये भाजपच्या आमदार राहुल आहेरांना भाजपच्या डॉ. कुंभार्डेंचाच अडथळा? 

चांदवड : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या डॉ. भारती पवार यांना सर्वाधीक ऐंशी हजार मतांची आघाडी चांदवड विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. त्यामुळे विधासभेसाठी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साह आहे. मात्र येथील राजकारण देवळा आणि चांदवड या दोन तालुक्‍यांतील भौगोलीकतेभोवती फिरत असते. अशा स्थितीत चांदवडचे इच्छुक एका झेंड्याखाली आल्यास लोकसभेतील भाजपसाठी अनुकूल वातावरण प्रतिकूल होणार काय याची जोरदार चर्चा व हालचाली राजकीय नेत्यांनी सुरु केल्याने भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर त्याला कसे उत्तर देणार याची उत्सुकता आहे. 

या विधानसभा मतदारसंघात चांदवड आणि देवळा या दोन तालुक्‍यांचा समावेश आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण यांना येथुन पाऊन लाख मते मिळाली होती. त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणूकीत प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. त्यात भाजपची पाऊन लाखांची आघाडी साडे नऊ हजारांपर्यंत खाली आली. विधानसभेला भाजपचे डॉ. राहूल आहेर यांना 54,946 मते मिळाली. त्यांनी कॉंग्रेसचे शिरीष कोतवाल यांचा अकरा हजार मतांनी पराभव केला. मात्र या विजयाचे श्रेय सध्या जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते आणि तेव्हा अपक्ष उमेदवारी केलेले चांदवडचे डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी घेतलेल्या 29,409 मतांना जाते. 

त्यावेळी चांदवडचे शिरीष कोतवाल (43,785), डॉ. कुंभार्डे (29,409), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तमबाबा भालेराव (27,000) आणि मनसेचे नवलकिशोर शिंदे (7000 मते) असे चार उमेदवार होते. या चौघांना 1,07,194 मते मिळाली होती. देवळा तालुक्‍यातून डॉ. आहेर हे एकमेव उमेदवार होते. त्यामुळे चांदवडच्या चौघांतील मतविभागणीला भाजपच्या विजयाचे श्रेय जाते. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने युतीचे विरोधक चांगलेच जमिनीवर आले आहेत. दोन्ही कॉंग्रेस एकत्र निवडणूकीला सामोरे जाणार आहे. सध्या भाजपमध्ये असलेले डॉ. कुंभार्डे हे चांदवडमधील असुन ते उमेदवारीसाठी उत्सुक आहे. अशा स्थितीत गेल्या निवडणूकीत पराभूत झालेले चारही उमेदवार एकत्र आल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील चित्र पालटू शकते. त्यासाठी इच्छुकांच्या गाठीभेटी चर्चा जोमात आहेत. गेतवेळचे प्रतिस्पर्धी शिरीष कोतवाल व उत्तमबाबा भालेराव सध्या सोयरे झाले आहेत. त्या दोघांचीही योग्य नावावर एकमत करण्यावर भर आहे. याचा अंदाज असल्याने भाजपचे आमदार डॉ. आहेर यांनी वॉटर कप, रस्ते, जलसंधारणाच्या माध्यमातून चांदवड तालुक्‍यावर लक्ष केंद्रीत केले आहे. 

तीस ते चाळीस गावांतील सरपंच व सदस्यांशी त्यांनी समन्वय स्थापित केला आहे. त्यामुळे लोकसभेला मोठी आघाडी घेणाऱ्या भाजपला चांदवड- देवळा विधानसभा निवडणूकीत मात्र एकतर्फी आघाडीची शक्‍यता धुसर आहे. त्याला आमदार डॉ. राहूल आहेर कसे सामोरे जातात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com