Dr. Jayashree did a haircut for Revenue Minister Thorat | Sarkarnama

भाच्याचा कित्ता मुलीने गिरविला, डाॅ. जयश्रीने केला महसूलमंत्री थोरातांचा हेअर कट

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 एप्रिल 2020

माध्यमासमोर वावरताना आपल्या राहणीमानाची विशेष दक्षता घेणाऱ्या महसूलमंमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या केसांचा हेअर कट करण्याचे काम त्यांची कर्करोगतज्ज्ञ असलेली कन्या डॉ. जयश्री थोरात हिने पार पाडले.

संगमनेर : लाॅक डाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या वडिलांची कटिंग स्वतः केली होती. त्याचाच कित्ता गिरवित थोरात यांचा हेअर कट त्यांची कन्या डाॅ. जयश्री हिने केला. 

कुटूंबात मुलापेक्षाही मुलगी पित्याच्या अधिक जवळ, अधिक लाडकी असते, हे सार्वत्रिक सत्य आहे. मुलीही बापासाठी कोणतेही दिव्य करतात. याचा प्रत्यय नुकताच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. सार्वजनिक जीवनात व माध्यमासमोर वावरताना आपल्या राहणीमानाची विशेष दक्षता घेणाऱ्या मंत्री थोरात यांच्या केसांचा हेअर कट करण्याचे काम त्यांची कर्करोगतज्ज्ञ असलेली कन्या डॉ. जयश्री थोरात हिने पार पाडले.

कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन असल्याने, जीवनावश्यक सेवा वगळता इतर उद्योगधंदे बंद आहेत. या पार्श्वभुमिवर नियमित हेअर कट करणाऱ्या अनेकांचे अवतार झाले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नाभिक कारागिर बोलावण्याची सोय नाही. त्यामुळे नाईलाज कसा असतो, याचा अनुभव मोठ्या शहरातच नव्हे, तर राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्रामस्थांनाही येत आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना आपला लुक चांगला असावा, याकडे अनेकांचा कटाक्ष असतो. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही या बाबतीत दक्ष असतात. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊनचा नियम सर्वांना सारखाच असल्याने, सलून बंद असल्याने त्यांच्या नियमित हेअर कट करण्यात बाधा आली होती. वडिलांची अडचण ओळखून डॉक्टर कन्या जयश्री हिने काल मुंबईत राहत्या घरातच आपल्या वडीलांचा हेअर कट करुन त्यांची अडचण सोडवली. कुठल्याही पूर्वानुभवाशिवाय हे काम करणे सोपे नसतानाही, डॉ. जयश्री यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावले. या मायलेकांचा हेअरकट करतानाचा फोटो सोशल माध्यमावर चांगलाच भाव खावून गेला.
 
सत्यजीत तांबे यांनी केले काैतुक
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांचे वडील आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा हेअर कट केल्याचा फोटो नुकताच सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. थोरातांच्या मुलीनेही हेअरकट केल्याचा फोटो आल्याने तांबे यांनी डाॅ. जयश्रीचे काैतुक केले. ते म्हणाले, ``अनेक वर्ष अभ्यास करुन वैद्यकिय ज्ञान मिळवणे व कोणताही पूर्वानुभव नसताना केस कापणे, ही दोन्ही कामे सोपी नाहीत. काम कुठलेही असो मेहनत आहेच.``
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख