काँग्रेसच्या ‘मिशन २४’ ची जबाबदारी डाॅ. अभय पाटील यांच्यावर ? 

..
abhay Patil
abhay Patil

अकोला :  लोकसभा आणि पाठाेपाठ विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला अनेक जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेणे सुरू झाले आहे. प्रदेश स्तरावरून बैठकांचे नियोजन करण्यात आले. कामगिरीची समीक्षा करतानाच काँग्रेसतर्फे ‘मिशन २०२४’ ची सुरुवातही करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे डाॅ. अभय पाटील यांना २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीत पुढे केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांच्याकडे थेट जिल्हाध्यक्षपदही सोपविल्या जाऊ शकते. याबाबत प्रदेश स्तरावरून चर्चा सुरू झाली असून, लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अकोला जिल्हा परिषद निवडणूक येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाची असेल. त्यामुळे पक्ष संघटनेत बदल करूनच या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. परिणामी येत्या काही आठवड्यातच जिल्हा काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे.         

हे मिशन पक्ष संघटनेत बदल करून मजबूत फळी निर्माण करण्यासाठी राबविले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणावर संघटनात्मक बदल होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्षपद मराठा समाजातील नेत्याकडे सोपविण्याबाबत पक्ष स्तरावरून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 राज्यात सत्ताधाऱ्यांविरुद्ध प्रचंड रोष असल्याची स्थिती होती. त्यानंतरही काँग्रेसला कामगिरी उंचावता आली नाही. अकोल्यासह अनेक जिल्ह्यात तर काँग्रेसचे खातेही उघडले नाही. काँग्रेसचे ‘हायकमाण्ड’मधील नेते विधानसभा निवडणुकीत कुठे फिरताना दिसले नाही. 


राष्ट्रीय स्तरावरील तर सोडाच पण प्रदेश स्तरावरील नेतेही उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरकले नाही. त्यामुळे काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसने राज्यातील संघटनात्मक बदलाबाबत गांभिर्याने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची पायाभरणी काँग्रेसतर्फे आतापासूनच सुरू करण्यात येणार आहे.

त्याची सुरुवात ही जिल्हा व महानगर स्तरावरील संघटनात्मक बदलापासून केली जाणार असल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातील संघटनात्मक बदलाबाबत प्रदेश स्तरावरून विचारणा सुरू झाली आहे. युवा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अहवाल घेतले जाणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com