dound tehsildae eats rice in front sugarcane harvesting workers in dound | Sarkarnama

..म्हणून ऊसतोडणी कामगारांसमोर तहसीलदारांनी खाल्ला भात

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 4 एप्रिल 2020

ऊसतोडणी मजूर गावाकडे जाऊ न शकल्याने त्यांची व्यवस्था दौंडमध्ये करण्यात आली आहे. 

दौंड : जिल्हा बंदीमुळे दौंड शहरात आश्रयास असलेल्या १७७ ऊस तोडणी कामगारांना दिल्या जाणाऱ्या भातामध्ये आळ्या असल्याच्या तक्रारी झाल्याने दौंड तालुक्याचे तहसीलदार संजय पाटील यांनी त्यांच्यासमोरच तो भात खाऊन तक्रारीचे निरसन केले. व्यवस्था करतो पण खोट्या तक्रारी करू नका, अशी विनंतीवजा सूचना त्यांना करावी लागली. 
 बीड, जालना व नगर जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांच्या एकूण आठ टोळ्या रेठरे (जि. सातारा) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी काम करीत होत्या. या टोळ्या कराड वरून दौंड शहर मार्गे नगर जिल्ह्याकडे ट्रॅक्टर - ट्रॅाल्यामंध्ये निघाल्या असता त्यांना सोनवडी (ता. दौंड) येथील भीमा नदी पुलाच्या अलीकडे एक एप्रिल रोजी अडविण्यात आले.

दौंड महसूल प्रशासनाने या कामगारांना दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलासमोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय प्रांगणात स्थलांतरित केले. तेथील वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करून त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, विद्युत जोड आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आज (ता. ४) दुपारी पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॅांग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे हे त्या कामगारांना जेवण देण्यासाठी आल्या असता कामगारांनी तक्रारींचा पाढा वाचत काहीही करून गावी जाण्याची सोय करण्याचा आग्रह धरला. दरम्यान तहसीलदार संजय पाटील व गट विकास अधिकारी गणेश मोरे हे विद्यालयात दाखल झाल्यावर त्यांच्यासमोर पुन्हा तक्रारी झाल्या.

एका कामगाराने तर भातामध्ये आळ्या असल्याची तक्रार करताच संजय पाटील यांनी भात मागविला व सर्वांसमोर तो भात खाऊन जागच्या जागीच तक्रारीचे निरसन करून तक्रारदाराची लबाडी उघडी पाडली. गावी जायची परवानगी सोडून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.  स्थलांतरितामध्ये पाच गरोदर महिला असल्याने व त्यामधील एकीची प्रसूतीची तारीख जवळ असल्याने गट विकास अधिकारी गणेश मोरे यांनी संबंधित रूग्णालयाशी संपर्क साधून आवश्यक ती व्यवस्था केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख