पवार यांनी दिलेला उमेदवार पाडण्याची दौंडमध्ये `प्रथा`च!

दौंडमधील १९७८, १९९० प्रमाणे २०१९ ची निवडणूक तालुक्याच्या कायम लक्षात राहील. दौंडच्या राजकीय इतिहासात तीन निवडणुकांचा विशेष उल्लेख करता येईल.
पवार यांनी दिलेला उमेदवार पाडण्याची दौंडमध्ये `प्रथा`च!

केडगाव : बारामती शेजारी दौंड तालुका असूनही येथे गेल्या तीन निवडणुकांत पवार विरोधी उमेदवार विजयी झाला आहे. अर्थात या आधी दौंडच्या १९७८, १९९० या दोन निवडणुकांतही पवारांच्या विरोधातील उमेदवाराला येथील मतदारांनी पसंती दिली होती. 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन निवडणुकांत पवार यांनी ज्याचा प्रचार केला तो उमेदवार पराभूत झाला.

राज्यात १९६२ ला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून निवडणुका सर्वसाधारणपणे पार पडत राहिल्या. १९७८ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात जनता पार्टीचे सरकार आले. या निवडणुकीत दौंडमध्ये पारगावचे राजाराम ताकवणे ( जनता पार्टी )  बोरीपार्धीचे काकासाहेब थोरात ( काँग्रेस ) लिंगाळीचे सिताराम भागवत ( अपक्ष ),  दौंडचे प्रेमसुख कटारिया ( अपक्ष ) अशी चौरंगी लढत झाली. या निवडणुकीत प्रथमच जातीनिहाय उमेदवार उभे राहिल्याने मतांची विभागणी झाली. या निवडणुकीत मराठा समाजाचे राजाराम ताकवणे ( २६,९४० मते ), धनगर समाजाचे काकासाहेब थोरात ( १८,६२२ मते ), माळी समाजाचे सिताराम भागवत ( १३,३५४ मते ), जैन समाजाचे प्रेमसुख कटारिया ( ५,८९० मते ) अशी मतांची विभागणी झाली.

ताकवणे यांना मतविभागणीचा फायदा झाला. भागवत हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मात्र त्यांना निवडणुकीत एेनवेळी उभे करण्यात आले होते. भागवत यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक कायम चर्चेत राहिली आहे.  १९८५ मध्ये काकासाहेब थोरात यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी मुंबईतून उमेदवारी दिली. काकासाहेब तेथून विजयी झाले.

१९९० मध्ये राज्यावर शरद पवार यांची एक हाती सत्ता असताना त्यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात सुभाष कुल यांनी बंड पुकारले. त्यावेळी बारामती तालुक्यातील तेवीस गावे दौंड मतदारसंघात असताना कुल यांचा विजय राज्यात चर्चेचा विषय झाला होता. 1990 ला पवारांच्या विरोधात बंड म्हणजे राजकीय आत्महत्याच मानली जात होती. तेव्हा कुल यांचे धाडस हाच चर्चेचा विषय झाला होता. मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्याने कुल यांचा विजय झाला. त्यामुळे ही निवडणुक अजूनही स्मरणात आहे. या निवडणुकीत कुल यांनी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार उषादेवी जगदाळे यांचा ९७८८ मतांनी पराभव केला होता.

त्यानंतर 2009, 2014 च्या निवडणुकीत अनुक्रमे राहुल कुल आणि रमेश थोरात हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. हे दोघेही त्या त्या  निवडणुकीत पराभूत झाले.दौंडमधील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवर शरद पवार यांचा मोठा पगडा राहिला. भाजपचे राहुल कुल व राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांच्यात सरळ लढत झाली. ही निवडणूक लक्षात राहिली ती शरद पवार यांचा झंझावात व रमेश थोरात यांचा ७४६ मतांनी झालेला पराभव यामुळे. मतांची शेवटची फेरी मोजेपर्यंत कोण विजयी होईल हे सांगता येत नव्हते.

पुणे जिल्ह्यात महायुतीचा सुपडासाफ होत असताना दौंड तालुक्यात राहुल कुल दुसऱ्यांदा विजयी झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्याने कुल विजयी झाले असे म्हणता येईल. रमेश थोरात यांचा ७४६ मतांनी झालेला पराभव हा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. १९६२ ते २०१९ दरम्यान इतकी चुरशीची निवडणूक कधीही झाली नाही.

राहुल कुल यांनी केलेल्या १४४० कोटी रूपयांच्या विकासकामांचे प्रतिबिंब मतदानात उतरले नाही. याउलट शरद पवार यांचा प्रभाव व रमेश थोरात यांचे कार्यकर्त्यांशी असलेले थेट संबंध यामुळे थोरात विजयाचा अगदी जवळ पोहचले. कुल यांचा निसटता विजय त्यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com