Don't politicise farmers sucide issue - CM Phadanavis | Sarkarnama

शेतकरी आत्महत्येवर राजकारण करू नका : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 मार्च 2017

"राज्यातील सुमारे 31 लाख शेतकर्यांवर कर्जाचा बोजा आहे.  हा बोजा हटविण्यासाठी शासनाला सुमारे 30 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, याबरोबरच शेतीमध्ये शाश्वत गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. " - मुख्यमंत्री

मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाच्या सलग दहाव्या दिवशीही कर्जमाफीसाठी आग्रही असलेल्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले. शेतकरी आत्महत्या कोणत्या सरकारच्या काळात सुरु झाल्या याच्या तपशीलात जायचे नसल्याचे सांगत फडणविसांनी विरोधकांना टोला लगावाला. तसेच या विषयाचे राजकारण न करता सभागृहात मांडला जाणारा अर्थसंकल्प शांतपणे ऐकून घेण्याची विनंती त्यांनी विरोधकांना केली.

विधानपरिषदेच्या कामकजाला सुरुवात होताच यवतमाळचे आमदार ख्वाजा बेग यांनी 289 अन्वये शेतकरी आत्महत्येच्या विषयाला हात घातला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनीही या विषयाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले. अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी कर्जमाफीची घोषणा झाली नाही तर कामकाज चालु न देण्याचा इशारा त्यांनी दिला. यावर विरोधी पक्षातील आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजीला सुरुवात केली.

याच दरम्यान सभापतींच्या परवानगीने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस निवेदन करण्यासाठी उभे राहिले. मात्र, विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला. याच गोंधळात मुख्यमंत्र्यांना आपले निवेदन करावे लागले.

"राज्यातील सुमारे 31 लाख शेतकर्यांवर कर्जाचा बोजा आहे.  हा बोजा हटविण्यासाठी शासनाला सुमारे 30 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, याबरोबरच शेतीमध्ये शाश्वत गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. " अशा शब्दांत मुख्यमंत्र्यानी निवेदनाला सुरुवात केली.

शासनाला शेतकऱ्यांची काळजी असल्यानेच उच्चस्तरीय समितिने केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेट घेतली. या मुद्द्यावर केंद्राने सकारात्मकता दाखविली असली तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले. सरसकट कर्जमाफी केली तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या 70 टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होईल. म्हणून शाश्वत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच गेल्या वेळी केलेल्या कर्जमाफी नंतरही 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि या आत्महत्याना सुरुवात कोणाच्या काळात झाली, याच्या तपशिलात मला जायचे नाही. पण या विषयावर राजकारण न करता विरोधकांनी आज मांडला जाणारा अर्थसंकल्प आणि केंद्राकडून अपेक्षित असलेला प्रतिसाद याची ज़रा प्रतीक्षा करावी. तसेच कामकाज सुरळीतपणे चालु द्यावे, अशी विनंती त्यांनी विरोधकांना केली.

मात्र, मुख्यमंत्र्यांचे निवेदन संपेपर्यंत विरोधकांचा गोंधळ सुरु असल्याने अखेर सभापती महोदयांनी सभागृह तहकूब केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख