मेट्रोचा आग्रह धरू नका, औरंगाबाद महापालिकेकडे पैसा आहे का? : नितीन गडकरी

नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता. 16) औरंगाबादेत होते. यावेळी ऑस्ट्रेलियन कंपनीच्या वतीने औरंगाबादेत स्कायबस चालवण्या संदर्भात महापालिकेचे महापौर, नगरसेवक यांना या प्रकल्पाचे सादरीकरण दाखवण्यात आले.
मेट्रोचा आग्रह धरू नका, औरंगाबाद महापालिकेकडे पैसा आहे का? : नितीन गडकरी

औरंगाबाद : "शहरातील वाहतूक कोंडी, प्रदुषण टाळून सर्वसामान्यांना मुक्तपणे फिरण्यासाठी फुटपाथ मोकळे असावे आणि शहर सुंदर दिसावे ही आपली अपेक्षा आहे. तेव्हा स्कायबसचा पर्याय महापालिकेने स्वीकारायला काही हकरत नाही. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर महापालिका, सिडकोच्या निधीतून कमी किमंतीत हे शक्‍य आहे. कुणी जर तुम्हाला मेट्रो सुरू करण्याचा सल्ला देत असेल तर तो न परवडणारा आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा काही भाग महापालिका म्हणून तुम्हाला टाकावा लागेल, तेवढी तुमची क्षमता आहे का? तुमच्याकडे पैसा आहे का?," असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना केला. 

नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता. 16) औरंगाबादेत होते. यावेळी ऑस्ट्रेलियन कंपनीच्या वतीने औरंगाबादेत स्कायबस चालवण्या संदर्भात महापालिकेचे महापौर, नगरसेवक यांना या प्रकल्पाचे सादरीकरण दाखवण्यात आले. 

त्यानंतर या प्रकल्पाच्या संदर्भात नितीन गडकरी यांनी स्वःत महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह नगरसेवक आणि प्रसार माध्यमांना माहिती दिली. गडकरी म्हणाले, "स्कायबस तयार करणाऱ्या कंपनीने शहरातील पुढील तीस वर्षानंतरच्या गर्दीचा विचार करून 15 कि.मी. अंतरात स्कायबस चालवण्यासाठी 900 कोटी रुपये खर्च येणार आहे.प्रति किलोमीटर 60 कोटी रुपये असा खर्च अपेक्षित आहे. परंतु या प्रकल्पासाठी लागणाऱ्या काही वस्तु आपण मेक इन इंडिया अंतर्गत भारतात तयार केल्या तर हा खर्च साधारणता 40 कोटींवर येऊ शकतो."  

ते पुढे म्हणाले, "महापालिकेला या स्कायबस फुकटात तर मिळतील शिवाय, शहरातून धूर सोडत धावणाऱ्या डिझेल बसच्या तिकीट दरातच या जनतेला लाभ मिळेल. महापालिका, सिडको, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निधीतून हा प्रकल्प राबवणे शक्‍य आहे. त्यानंतर पीपीपी तत्तवावर स्कायबस चालवण्यास देता येतील. यासाठी उभाराव्या लागणाऱ्या स्टेशनवर रेस्टॉरंट, शॉप उभारून याचा खर्च भागवता येऊ शकेल. वीजेचा खर्च देखील सोलारच्या माध्यमातून निघू शकेल." असेही त्यांनी सांगितले. 

"आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या स्कायबसचा महापालिकेने विचार केला पाहिजे. नागपूरमध्ये मेट्रोच्या वेळी आम्हाला हा अनुभव आला. महापालिकेची स्थिती इतकी खराब होती की कर्मचाऱ्यांचे पगार करायला देखील आमच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा तुम्हाला जर कोणी मेट्रो आणा म्हणत असेल तर त्याच्या नादाला लागू नका. 350 कोटी प्रति कि.मी. इतका त्यासाठी खर्च येतो. तुमच्या शहरात 15 कि.मी. ची मेट्रो चालवायची म्हटंल तर साडेचार ते पाच हजार कोटींचा खर्च लागेल. त्यासाठी महापालिकेला वाटा म्हणून साडेतीनशे कोटी रुपये मोजावे लागतील. एवढा पैसा तुमच्याकडे आहे का?" असा सवाल करत वॅपकॉस कंपनीकडून डीपीआर तयार करून घ्या, असे निर्देश देखील नितीन गडकरी यांनी महापालिकेचे आयुक्त, महापौर यांना दिले. 

गडकरी साहेब आमची स्थिती, तुमच्या सारखीच- घोडेले
स्कायबस प्रकल्पा संदर्भात माहिती देत असतांना नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेचे उदाहरण देत तिथे मेट्रो चालवतांना कशा अडचणी आल्या याची आठवण सांगितली. तुमच्या शहरात मेट्रो चालवायची असेल तर महापालिकेकडे एवढा पैसा आहे का? आपल्याला तर सगळ फुकटात लागतं, असा टोला लगावला. यावर महापौर नंदकुमार घोडले यांनी देखील हसत "गडकरी साहेब आमची स्थिती देखील तुमच्या नागपूर महापालिके सारखीच आहे'' असे उत्तर दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com