अध्यक्षपदाच्या मोहात डोणगांवकर पती - पत्नीने पक्षही गमावला, सत्तार मात्र बचावले

 अध्यक्षपदाच्या मोहात डोणगांवकर पती - पत्नीने पक्षही गमावला, सत्तार मात्र बचावले

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मोह आणि त्यासाठी नव्यानेच पक्षात आलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून केलेली बंडखोरी ऍड. देवयानी डोणगांवकर, त्यांचे पती कृष्णापाटील डोणगांवकर यांना चांगलेच महागात पडली. जिल्हा परिषद सदस्यांनी साथ दिली, पण नशिबाने दगा दिल्यामुळे आज डोणगांवकर दाम्पत्यावर पक्षही गमावण्याची वेळ आली. ज्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची चर्चा दिवसभर राज्यभर गाजली, त्या सत्तारांचे मंत्रिपद तर शाबूत राहिले, पण डोणगांवकर दाम्पत्यावर मात्र पक्षाने हकालपट्टीची कारवाई केली. 

औंरगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तार यांनी कॉंग्रेस विरोधातील राग काढण्यासाठी शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. देवयांनी डोणगांवकर यांचा हत्यार म्हणून वापर केला. गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या पण युतीमुळे मतदारसंघ भाजपला सुटल्यामुळे डोणगांवकर नाराज होते. एवढेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन आपल्याला उमेदवारी द्या अशी मागणी केल्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तेव्हा व्हायरल झाले होते. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सांस्कृतिक मंडळावरील सभेनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती. तेव्हा सध्या शांत राहा तुमचा योग्य सन्मान करू अशा शब्द उध्दव ठाकरे यांनी त्यांना दिला होता असे बोलले जाते. बहुदा अध्यक्षपदी पुन्हा संधी देऊ असा तो शब्द असावा ? परंतु राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील राजकीय गणितेही बदलली. 

त्याचाच फटका देवयानी डोणगांवकर यांना बसला. कॉंग्रेसने अध्यपदावर दावा सांगत महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे आवाहन शिवसेना नेतृत्वाला केले. त्यानुसार अध्यक्षपद महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाला आणि डोणगांवकरांच्या दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याच्या आशाही मावळल्या. 

सत्तारांची खेळी यशस्वी, पण नशिबाचा दगा.. 
देवयांनी डोणगांवकर यांना बंडखोरी करायला लावून अब्दुल सत्तार यांनी आपले उपद्रवमुल्य दाखवायला सुरूवात केली होती. यामागे कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष करण्याला विरोध हे एक कारण असले तरी कॅबिनेटची आशा असतांना राज्यमंत्रीपदावर बोळवण केल्याचा राग देखील होता. शिवाय जिल्हा परिषदेतील अत्यंत महत्वाचे असे बांधकाम सभापतीपद आपल्या समर्थक सदस्याला मिळाले पाहिजे हा सत्तार यांचा आग्रह देखील पुढील राजकीय घडमोडीला कारणीभूत ठरला. 

ज्या शिवसेनेने भाजपला राज्याच्या सत्तेत नाकारले, त्याच भाजपची मदत घेऊन सत्तार यांनी जिल्हा परिषदेत आपले घोडे पुढे दामटवले. राज्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचा फार्स देखील त्यांच्या मदतीला धावून आला. भाजपला विश्‍वासात घेण्यासाठी सत्तार यांनी केलेली ती खेळी होती का? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. सत्तार यांची रणनिती ठरल्याप्रमाणे सभागृहात यशस्वी देखील ठरली. सत्तार समर्थकांसह भाजपची मते डोणगांवकर यांच्या पारड्यात पडली. बरोबरी झाल्यानंतर चिठ्ठी काढण्याचा निर्णय झाला आणि तिथेच नशीबाने सत्तार, डोणगांवकरांची साथ सोडली. 

डोणगांवकरांचा राजकीय बळी.. 
अध्यक्षपदासाठी डोणगांवकर दाम्पत्यांने थेट मुख्यमंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा उध्दव ठाकरे यांच्या आदेशाला जुमानले नाही, त्यामुळे सहाजिकच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार हे निश्‍चित होते. ईश्‍वर चिठ्ठीने अध्यक्षपद महाविकास आघाडीला मिळाले असले तरी उपाध्यक्ष पदासाठीच्या शिवसेना उमेदवाराचा मात्र पराभव झाला. याची मोठी किंमत डोणगांवकरांना चुकवावी लागली. तिकडे या सगळ्या नाट्याचे सूत्रधार अब्दुल सत्तार यांना महसुल व ग्रामविकास खाते देण्यात आले, तर दुसरीकडे डोणगांवकर दामपत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. विशेष म्हणजे दिवसभर सुरू असलेल्या राजीनाम्याचा बातम्यावर मौन धारण करून बसलेले अब्दुल सत्तार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर मात्र बोलायला लागले. 

माझ्या राजीनाम्याची पुडी सोडली, मी राजीनामा दिलाच नाही, माझा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर आहे असे सांगायला लागले. सत्तार यांना पक्षाकडून अभय मिळाले, पण डोणगांवकर यांचा मात्र या नाट्यात राजकीय बळी गेल्याचे दिसते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com