राज ठाकरे, यूपीवाल्यांचा डीएनए एकच : सुब्रमणियम्‌ स्वामी  - Dombivali Raj Thackeray Subramanian Swamy | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरे, यूपीवाल्यांचा डीएनए एकच : सुब्रमणियम्‌ स्वामी 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

एकीकडे शिवसेना आणि मनसे राहुल गांधींचे गुणगान गात असली तरी तो त्यांचा प्रश्‍न आहे. राज ठाकरे आणि यूपीवाल्यांचा डीएनए एकच आहे, अशी टीका राज्यसभा खासदार आणि भाजप नेते सुब्रमणियम्‌ स्वामी यांनी येथे केली. 

डोंबिवली : एकीकडे शिवसेना आणि मनसे राहुल गांधींचे गुणगान गात असली तरी तो त्यांचा प्रश्‍न आहे. राज ठाकरे आणि यूपीवाल्यांचा डीएनए एकच आहे, अशी टीका राज्यसभा खासदार आणि भाजप नेते सुब्रमणियम्‌ स्वामी यांनी येथे केली. 

डोंबिवलीतील एका खासगी कार्यक्रमासाठी सुब्रमणियम्‌ स्वामी आले होते. या वेळी त्यांनी विविध विषयांवर फटकेबाजी केली. राज ठाकरे आणि यूपीचा रिक्षावाला यांचा डीएनए तपासला तर दोघांचा नक्की एकच निघेल, असे जाहीर वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले. ते म्हणाले, ""राज यांनी आपल्याला डीएनएबाबत आव्हान केल्यास राज यांचा डीएनए यूपीचाच असल्याचे सिद्ध करून दाखवू. राज यांना हे माहीत असल्यानेच ते सध्या यूपीवाल्यांच्या विरोधात बोलत नसल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना आणि मनसे राहुल गांधींचे गुणगान गात असली तरी तो त्यांचा प्रश्‍न आहे. माझ्यालेखी राहुल गांधी बुद्धूच आहेत.'' 

राममंदिर हे रामजन्मभूमीतच उभे राहणार, असा दावा त्यांनी केला. याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात आपणच जिंकू; मात्र त्यापूर्वी श्रीश्री रविशंकर मध्यस्थी करून तोडगा काढणार असतील, तर त्याचं स्वागतच असेल, असे स्वामी म्हणाले; तर काश्‍मीरला अधिक स्वायत्तता देण्याची पी. चिदंबरम्‌ यांची मागणी त्यांनी धुडकावून लावली. 

मनसेने विचारला जाब 
सुब्रमणियम्‌ स्वामी यांच्या वक्तव्यामुळे संतापलेले मनसे प्रदेश सचिव राजेश कदम यांनी कार्यक्रम संपल्यानंतर थेट स्वामींना राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. तुम्ही मराठी माणसासाठी काय केले? ठाकरेंचा डीएनए काढण्याचा तुम्हाला काय अधिकार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. कदम यांचे उग्र रूप पाहून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख