डोंबिवली: मतदानाचा घटलेला टक्का  रवींद्र चव्हाणांना अडचणीत आणणार ? 

मागील दहा वर्षात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत शासन व विविध विकासकामांमधून शहर सुविधांवर सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्च केले गेले. पालिकेच्या अर्थकंसकल्पाच्या माध्यमातून सुमारे २० हजार कोटींचा निधी खर्च करण्यात आला. एवढा खर्च करुनही शहर आज बकाल अवस्थेत आहे. भाजपाचेच वरीष्ठ नेते कल्याण डोंबिवली शहरांची गणना घाणेरडे शहर म्हणून करतात.
डोंबिवली: मतदानाचा घटलेला टक्का  रवींद्र चव्हाणांना अडचणीत आणणार ? 

ठाणे - डोंबिवली शहराची ओळख सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून असली तरी सुशिक्षित मतदारांनीच लोकशाही अधिकाराकडे पाठ फिरवित शहराच्या दुरावस्थेविषयी मनात असलेला असंतोष सोमवारी व्यक्त केल्याचे शहरात घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट झाले. 

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गेली दहा वर्षे एकाच लोकप्रतिनीधीच्या हाती हा मतदारसंघ असून ते राज्यमंत्रीही आहेत. परंतू दहा वर्षात एकही विकास प्रकल्प या मतदारसंघात पूर्णत्वास गेला नाही. रस्त्यांची अवस्था इतकी खराब असून यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. 

असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्र्यांनी 371 कोटी निधी रस्त्यांसाठी आणला अशी घोषणा केल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच माणकोली पूल व ठाकुर्ली पूलाची कामे रखडली असताना ही विकासकामे झाल्याची बतावणी भाजपाच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारात केली. तर दुसरीकडे मनसेच्या उमेदवारांनी या कामांची पोलखोल करुन सत्य परिस्थितीची जाणीव मतदारांना करुन दिली. यासर्व वातावरणाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसून आले.

 मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही एकही सुविधा नाही की एकही प्रकल्प पुर्णत्वास आले नाहीत. शहरातील विकासकामांप्रति असलेला जनतेच्या मनातील रोष विधानसभा निवडणुकीच्या घटलेल्या टक्केवारीवरुन दिसून येतो. मतदानाची टक्केवारी घटल्याने मतांच्या टक्केवारीचे विभाजन होऊन त्याच उमेदवारांना जनता पुन्हा संधी देऊ पहात आहे की त्यांना बदल हवा आहे हे चित्र गुरुवारी स्पष्ट होईल.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदार संघात 47.96 टक्के मतदान झाले होते. तर यंदाच्या निवडणुकीत 40.72 टक्के मतदान झाले आहे. सात टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी घसरली आहे. 2014 ते 2019 या कालावधीत 11 हजार मतदारांची संख्या वाढूनही यंदा केवळ 1 लाख 44 हजार 983 मतदारांनी मतदान केले. मतदारांची संख्या वाढूनही टक्का मात्र घसरल्याचे चित्र या मतदारसंघात आहे. 2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्षियांनी स्वतंत्र निवडणुक लढविली होती. यावेळी भाजपाचे रविंद्र चव्हाण यांना 56 टक्के मते मिळाली होती, तर सेनेचे दिपेश म्हात्रे यांना 25 टक्के मते मिळाली होती. आघाडीला अवघी 9 टक्के तर मनसेला 8 टक्के मतदान या विभागातून झाले होते. यावर्षी या मतदारसंघातून एकूण 6 उमेदवार निवडणूक रिंगणात असून खरी लढत ही मनसे आणि महायुतीमध्ये असणार असून इतर चार उमेदवारांच्या टक्केवारीवरुनही कोणता उमेदवार विजयी होणार यावर गणित अवलंबून आहे.

भाजपाचे रविंद्र चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग डोंबिवलीत आहे. तसेच संघाचा व इतर भाषिकांचा पाठिंबाही भाजपाकडे आहे. परंतू कोकणी मतदार भाजपाच्या उमेदवारांवर नाराज असून आता समाजाच्या नेत्यापेक्षा दुसऱ्यांना संधी देऊन पाहू असा विचार कोकणी मतदार करीत आहे. मुलभूत समस्यांसोबतच जनतेशी असलेला संपर्क हा आमदारांचा कमी होत असून यामुळेही नाराजीचे वातावरण जनमानसात आहे. 


मनसेचे मंदार हळबे हे मनमिळावू आणि शांत स्वभावाचे असल्याने त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडण्याचा मतदारांचा कल गेल्या काही वर्षापासून वाढू लागला आहे. एकदंरीत वातावरण पहाता भाजपाला एकहाती विजयाची खात्री असली तरी त्यांना मनसे अटीतटीची लढत देईल अशी शक्यता आहे. येत्या गुरुवारीच कोणाचा किती मताधिक्याने विजय होतो यावरुन भाजपाचे वर्चस्व या मतदारसंघावर कितपत टिकून आहे हे सिद्ध होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com