लातूरच्या अण्णाराव पाटलांनीही सोडली प्रकाश आंबेडकरांची साथ?

अण्णाराव पाटील यांनी लातूर महापालिकेच्या निवडणुकीवेळीच एमआयएमशी युतीचा प्रयोग केला होता. त्यांनी असदुद्दीन औवेसी यांना लातूरमध्ये आणले होते. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी औवेसींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली होती.
does there any rift between annarao patil and prakash ambedkar
does there any rift between annarao patil and prakash ambedkar

पुणे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे प्रमुख साथीदार हळूहळू वेगळी वाट चोखाळू लागले आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी 'वंचित'ची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विश्वासू सहकारी आणि पार्लमेंटरी बोर्डाचे प्रमुख अण्णाराव पाटील यांनीही आपला सवता सुभा मांडला आहे.

आनंदराज आंबेडकर हे 'रिपब्लिकन सेना' नावाची स्वतंत्र संघटना चालवतात. लोकसभा निवडणुकीवेळी 'वंचित'ची हवा तयार होत असताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिंब्यासाठी सक्रिय भुमिका घेतली होती. सोलापूर मतदारसंघात त्यांनी प्रचार केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी ते काँग्रेसशी युती करण्यासंबंधी 'वंचित'ची भुमिका मांडत होते. 

याचदरम्यान त्यांनी दिल्लीत काँग्रेस प्रवेश केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र वंचित आघाडीने त्याचे तातडीने खंडन केले होते. मात्र त्यावेळी आंबेडकर बंधूंमध्ये आलबेल नसल्याचे समोर आले होते. त्याचा प्रत्यक्ष परिणाम दोन आठवड्यापुर्वी पहायला मिळाला. 'वंचित'ला राजकीय यश न मिळाल्याने आपण वेगळी वाट चोखाळत असल्याचे आनंदराज यांनी स्पष्ट केले. त्यांनी रिपब्लिकन सेनेची कार्यकारिणीही त्यानिमित्ताने जाहीर केली. 

आनंदराज यांच्यानंतर लातूरचे अण्णाराव पाटील हेही प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर नसल्याचे समोर आले आहे. अण्णाराव पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र लोकसभा- विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी वंचित आघाडीचा प्रवाह बळकट करण्याचा निर्णय घेतला. अण्णाराव पाटील यांनी भटके विमुक्त, ओबीसी समाज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपली ताकद वापरली. अण्णाराव यांच्याकडे 'वंचित'च्या पार्लमेंटरी बोर्डाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते कोल्हापूर अशी सत्तासंपादन यात्रा काढण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भुमिका घेवून पाटील राज्यभर फिरले होते. मात्र निवडणूक झाल्यापासून ते आंबेडकरांपासून अंतर ठेवून आहेत. 

काही दिवसांपुर्वी प्रकाश आंबेडकर यांनी 'भारीप'चे विलीनीकरण वंचित आघाडीत केले. त्यावेळीही अण्णाराव पाटील उपस्थित नव्हते. दुसऱ्या बाजूला अण्णाराव यांनी आपल्या मूळ पक्षाचे काम सुरू करून औरंगाबादमध्ये मेळावा घेतला. दोन दिवसांपुर्वी त्यांनी यवतमाळ- वाशिमच्या विधान परिषद निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देवून निवडणुकीत रंगत आणली आहे. महत्वाची बाब म्हणजे अण्णाराव हे हेलिकॉप्टर घेवून प्रचाराला गेले असल्याने नव्याने चर्चेत आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com