लष्कराच्या मदतीची वेळ येऊ देऊ नका - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाप्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे
Do not force us to Call Military Appeal by Ajit Pawar
Do not force us to Call Military Appeal by Ajit Pawar

मुंबई : ‘कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं ‘कोरोना’चं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही  त्यांनी केलं आहे.

मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातील मुद्दे..

▪डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले दुर्दैवी. असे हल्ले सहन केले जाणार नाहीत.

▪‘कोरोना’ प्रतिबंधक कार्यात अडथळे आणणाऱ्या व डॉक्टर, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करणार

▪पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त व संयम पाळावा.
▪    लोक बाजारात, रस्त्यावर ज्या पद्धतीनं गर्दी करत आहेत. सुरक्षित अंतर पाळत नाहीत, यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत आहे. 

▪नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होणे, कोरोना प्रादुर्भावासाठी चिंताजनक आहे.

▪कोरोना प्रतिबंधक अंमलबजावणीसाठी, लष्कराची मदत घ्यायला लागू नये हे पाहणं आपली सर्वांची जबाबदारी.

▪प्रवासबंदी असताना दुधाच्या टँकरमधून प्रवास करण्यासारख्या घटना गंभीर

▪राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत

▪दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू घरपोच, सोसायटीपर्यंत उपलब्ध करण्याचे नियोजन व्हावे.

▪केंद्रीय वाहतूकमंत्री  नितीन गडकरी यांनी केलेल्या टोलमाफीच्या घोषणेचे स्वागत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com