As Dixit left ACB , the performance of department deceased | Sarkarnama

दीक्षीत गेले आणि पाच वर्षात एसीबीच्या कामगिरीलाओहोटी लागली

उत्तम कुटे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

राज्यात अव्वल असलेल्या एसीबीच्या पुणे परिक्षेत्राची (रेंज)  कामगिरीही २०१८ च्या तुलनेत २०१९ ला नऊ टक्यांनी खालावली आहे.

पिंपरीः भ्रष्टाचाऱ्यांना पकडणारा राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यावर्षी सुस्तावला आहे.त्यामुळे त्यांचे ट्रॅप (सापळे) गतवर्षीपेक्षा यावेळी दोन टक्यांनी कमी झाले आहेत. राज्यात अव्वल असलेल्या एसीबीच्या पुणे परिक्षेत्राची (रेंज)  कामगिरीही २०१८ च्या तुलनेत २०१९ ला नऊ टक्यांनी खालावली आहे.याचा अर्थ लाचखोरीचे प्रमाण कमी झाले नसून ती उघडकीस येण्याचे प्रमाण घटले आहे.

यावर्षी आतापर्यंत ११ महिन्यांत राज्यात लाच घेताना पकडले जाण्याचे ७७६ गुन्हे नोंदले गेले. गतवर्षी याच कालावधीपर्यंत हा आकडा ७९४ होता. प्रवीण दीक्षीत डीजीपी (महासंचालक) असताना एसीबीची कामगिरी अत्युच्च पातळीवर गेली होती.

२०१३ ला संपूर्ण राज्यात फक्त ५८३ ट्रॅप झाले होते. दीक्षीत एसीबीत येताच २०१४ ला हा आकडा १,२४५ म्हणजे दुप्पटीहून अधिक झाला.हाच कल २०१५ लाही कायम राहिला.त्यावर्षी १,२३४ ट्रॅप झाले.

मात्र, दीक्षीत गेले अन एसीबीच्या कामगिरीलाओहोटी लागली. २०१६ ला ते ९८५,तर २०१७ ला ८७५ पर्यंत घसरले. २०१८ ला ते ८९१ झाले. यावर्षी,तर ते ११ महिन्यांत फक्त ७७६ झाले आहेत. राहिलेल्या एक महिन्यात किती ट्रॅप होऊन यावर्षीचा हा आकडा आठशेचा,तरी टप्पा पार करतो का नाही,ही चिंता या विभागाला लागली आहे.

गेली चार वर्षे एसीबीचा पुणे विभाग राज्यात अव्वल कामगिरी करीत आहेत. हे वर्षही त्याला अपवाद नाही. एसीबीच्या राज्यातील आठ परिक्षेक्षात (रेंज) पुणे विभागातच सर्वाधिक म्हणजे ७७६ पैकी १५७ ट्रॅप आतापर्यंत ११ महिन्यांत झाले आहेत. औरंगाबाद रेंज दुसऱ्या स्थानी आहे.

पुणे विभाग २०१९ ला पहिल्या क्रमाकांवर असला,तरी त्याच्या कामगिरीत २०१८ च्या तुलनेत घसरण झाली आहे. गतवर्षी पुणे विभागाने १७४ ट्रॅप केले होते.महिन्यागणिक कारवाईचा विचार केला,तर यावर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यात सर्वाधिक कमी ट्रॅप झाले. गतवर्षीपेक्षा ते तब्बल चाळीस टक्याने कमी आहेत.

ट्रॅपच्या जोडीने बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची (अपसंपदा)प्रकरणे हूडकून काढण्यातही यावर्षी एसीबीला तुलनेने कमी यश आले आहे. २०१८ ला अपसंपदेचे २२ गुन्हे नोंदले होते.२०१९ ला ते चारने कमी होऊन १८ वर आले. इतर भ्रष्टाचाराच्या केसेस,तर यावर्षी खूपच कमी म्हणजे अवघ्य पाचच झाल्या आहेत. गेल्यावर्षी त्या २३ होत्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख