दिवाळी संपली; मुंबईत रंगणार सत्तास्थापनेचे राजकीय नाट्य

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे गटनेते कोण असणार, याची उत्सुकता!
दिवाळी संपली; मुंबईत रंगणार सत्तास्थापनेचे राजकीय नाट्य

मुंबई ः दिवाळी संपल्यानंतर राज्यात नवीन राजकीय घडामोडींची धुळवड सुरू होणार आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्तास्थापना नाट्याचा पहिला अंक सुरू होणार असून, त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची रणनीती ठरेल. दुसरीकडे विधिमंडळातील नेता निवडण्यासाठी सर्वपक्षीय बैठकाही सुरू होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 105, शिवसेनेने 56, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 54 आणि कॉंग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पक्ष आणि एमआयएम यांचे प्रत्येकी दोन, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार असेल. त्याचप्रमाणे 13 अपक्ष आमदार विधानसभेत बसणार आहेत.

महायुतीत सत्तास्थापनेसाठी घडामोडी सुरू असून मुख्यमंत्री कोण असेल, यावरून शिवसेना-भाजप यांच्यात रस्सीखेच रंगली आहे. सत्तेत निम्मा-निम्मा वाटा या तत्त्वानुसार मुख्यमंत्रिपद आलटून-पालटून अडीच वर्षे घेण्याची चर्चा सुरू आहे. पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असा दावा करण्यात येत आहे.

परंतु; असा कोणताही निर्णय झाला नसून, शिवसेनेला आश्‍वासनही दिले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याचे प्रभारी सरोज पांडे यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे. अन्य नेतेही भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे ठामपणे सांगत आहेत. या घडामोडींमुळे युतीतील तिढा वाढल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवे असल्यास पाठिंबा देण्याची तयारी कॉंग्रेसने दर्शवली आहे. त्याच वेळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र जनतेने आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यातील तिढा सुटण्यावरच अन्य राजकीय समीकरणांची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.
विधिमंडळ नेता निवडण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठका आता सुरू होणार आहेत. विधिमंडळात भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे असतील. कॉंग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा असली, तरी निर्णय दिल्लीतच होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांची नावे पुढे आली असून, पक्षाध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेच विधिमंडळात नेते असतील. समाजवादी पक्षाचे अबू आझमी, बविआचे हितेंद्र ठाकूर सभागृह नेते होण्याची शक्‍यता आहे.

संभाव्य विधिमंडळ नेते
- भाजप : देवेंद्र फडणवीस
- शिवसेना : आदित्य ठाकरे
- राष्ट्रवादी कॉंग्रेस : अजित पवार/धनंजय मुंडे/जयंत पाटील
- कॉंग्रेस : बाळासाहेब थोरात/विजय वडेट्टीवार/नाना पटोले
- समाजवादी पक्ष : अबू आसिम आझमी
- बहुजन विकास आघाडी : हितेंद्र ठाकूर
- एमआयएम : डॉ. फारूक शाह/मौलाना मुफ्ती इस्माईल
- प्रहार जनशक्‍ती पक्ष : बच्चू कडू
- मनसे : राजू पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com