दिवाळी, गणपतीप्रमाणे आम्ही शिवजयंती तिथीनुसारच करणार - राज ठाकरे

दिवाळी, गणपतीप्रमाणे आम्ही शिवजयंती तिथीनुसारच करणार - राज ठाकरे

औरंगाबाद : मला अनेकांनी विचारले कि, तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची का तारखेनुसार ? मी म्हटले खरंतर 365 दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी किंवा गणपती हे सण आपण तारखेनुसार साजरे करत नाही. त्यामुळे महाराजांची जयंती हा देखील सण असून तो तिथीनुसारच साजरा झाला पाहिजे असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 

क्रांती चौकात मनसेतर्फे गुरुवारी (ता. 12 ) दुपारी बारा वाजता शिवपुजन करुन तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह मनसैनिक हजर होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले मी एके दिवशी कालनिर्णयचे जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो. साधारणपणे पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल. जयंतराव तुमचं काय मत आहे, शिवजयंती तारखेनुसार करायची कि तिथीनुसार ? ते म्हणाले, 365 दिवस करायची. आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये सण साजरे करतो, आपण दिवाळी तारखेनुसार साजरी करत नाही. गणपती तारखेनुसार साजरे करत नाही. त्यामुळे आजचा दिवस म्हणजेच महाराजांची जयंती हा सण तिथीनुसारच झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती महोत्सव होतोय असेही ठाकरे म्हणाले. 

कोरोना व्हायरसमुळे कसे करायचे ? असे काहीजण विचारत होते. मी म्हटले, आधीच या देशात इतकी रोगराई आहे, त्याच्यात आणखी एक आजार वाढला, काय फरक पडतो? असे असले तरी, तुम्ही काळजी घेतली पाहिजे. अशा कुठल्याही गोष्टीची लागण महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. पण हा उत्सव दिमाखात साजरा करा. शोभायात्रा तिथीनुसार पार पडेल, त्याला गालबोट लागणार नाही. याचीही काळजी घ्या. असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

क्रांती चौकात शिवपूजन दहा वाजता होणार होते मात्र, राज ठाकरे दोन तास उशिरा आले. शिवजयंतीसाठी लेझीम, मलखांब, मर्दानी खेळ यासाठी शाळेचे विद्यार्थी आले होते. शहरातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा मनसेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. सिडको ते क्रांती चौकादरम्यान वाहन रॅली काढण्यात आली. नाशिकचे ढोल, छावणीचे वाद्यपथक, महापालिका शाळा, खासगी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 

मनसे नेते अभिजीत पानसे, जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे, सुमित खांबेकर यांच्यासह प्रकाश महाजन, दिलीप बनकर, मनसे संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर, संदीप कुलकर्णी, आशिष सुरडकर, अमित भांगे, चेतन पाटील, राहुल पाटील, संकेत शेटे, योगेश शहाणे आदींची उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com