diwakar rawate and sharat pawar | Sarkarnama

रावते यांना शरद पवार यांनी सुनावले कडवे बोल, सांगितली कर्मचाऱ्यांबरोबरच्या सुसंवादाची गरज...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पवारांचा लय जोर 
एसटी कर्मचारी काहीही करु शकतात, याचा मी अनुभव घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते भाऊ फाटक यांचे आणि माझे चांगले संबंध. त्यामुळे एसटी संघटनांचे अधिवेशन असो की साखर कारखाना संघटना, शिक्षक संघटना यांच्या अधिवेशनाला मी न चुकता जातो. 1967 साली पहिली निवडणूक लढत असताना एसटी कर्मचारी काय करु शकतात, याचा मी अनुभव घेतला. गावागावात फिरणाऱ्या एसटीतील कंडक्‍टर सांगायचे, शेजारील गावात गेलो होतो. जिकडे बघेल तिकडे पवारांचाच जोर आहे. बाजार गाडीतही हीच चर्चा. त्यामुळे जोर असो की नसो, एस.टी.कर्मचारी मात्र काहीही करु शकतात, हे त्यावेळी दिसून आले, असे सांगताच अधिवेशनात चांगलाच हशा पिकला. 

कोल्हापूर : एसटी कर्मचारी संघटनेचे दरवर्षीचे अधिवेशन व यावर्षीचे अधिवेशन वेगळे वाटत आहे. मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी असून उत्साह मोठा आहे. या अगोदरचे परिवहन मंत्री दिवाकर रावते चार वर्षे अधिवेशनाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे अधिवेशनावर काही परिणाम झाला नाही. मात्र सत्ता बदलताच रावते यांची जबाबदारी काढून उध्दव ठाकरे यांनीही जबाबदारी अनिल परबांवर दिली. या बदलाचा परिणाम यंदाच्या अधिवेशनात दिसत असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी श्री. रावते यांना टोला लगावला. 

 

मंत्री आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद पाहीजे, तो नसल्याचे गेल्या चार वर्षात जाणवले असे सांगतून श्री. पवार म्हणाले, "1984 साली एसटीचे कोल्हापुरात अधिवेशन झाले होते. तेव्हा भाऊ फाटक, जॉर्ज फर्नांडिस यांच्या समावेत मीही अधिवेशनास उपस्थित होतो. जशी एसटीची गाडी कधी थांबत नाही तसे माझेही अधिवेशनाला येणे थांबलेले नाही. अधिवेशनात संघटनांचे प्रश्‍न समजून येतात, त्यावरचे मार्ग सापडतात. 1976 साली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. दिल्लीतील सरकार कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा देईल, तशाच सुविधा त्या दिवसापासून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य व्हावी, असे मला वाटत होते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हा निर्णय घेतला.'' एसटीच्या संचित तोटा वाढत असल्याचे सांगत खा. पवार म्हणाले, " शासनाने या प्रकरणी जे लागेल ते करणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारची शक्‍ती पाठिशी असल्याशिवाय एसटीच्या समस्या सुटणार नाहीत, असेही खा. पवार यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख