Diwakar Ravte takes a dig at MLA Kshirsagar says to complete a hat trick people should vote | Sarkarnama

दिवाकर रावतेंचा आमदार क्षीरसागरांना टोला : जनतेने मते दिल्याशिवाय हॅट्रिक  होत नसते !

सरकारनामा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

जास्त हवा भरली, की फुगा फुटतोच. त्यामुळे अर्विभावात -राहू नका. अनाठायीपणा टाळा. बुद्धी शाबूत ठेऊन, विरोधकांचे गनिमी कावे ओळखून कार्यरत रहा.

-दिवाकर रावते

कोल्हापूर  : " आमदार राजेश क्षीरसागर यांची हॅट्रिक   करण्यसाठी मी आलो असल्याचे सभागृहात सांगण्यात येत आहे. मात्र हॅट्रिक  करायची की नाही, हे तुम्हाला ठरवायचे आहे. ही लोकशाही आहे. यात जनतेने मतं दिल्याशिवाय हॅट्रिक  होत नसते," असा टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी क्षीरसागरांना  लगावला  . रविवारी शिवसेनेच्या कोल्हापूर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

येथील केशवराव भोसले नाट्यगृहातील मेळाव्यास शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार राजेश क्षीरसागर प्रमुख, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वैशाली क्षीरसागर प्रमुख उपस्थित होत्या.

सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क नेतेपदी निवड झाल्याबद्दल मंत्री रावते यांचा आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला. या मेळाव्याद्वारे आमदार क्षीरसागर यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

" जास्त हवा भरली, की फुगा फुटतोच. त्यामुळे अर्विभावात -राहू नका. अनाठायीपणा टाळा. बुद्धी शाबूत ठेऊन, विरोधकांचे गनिमीकावे ओळखून कार्यरत रहा. आक्रमकता कोणासाठी दाखवायची?  का दाखवायची ? आणि कशासाठी दाखवायची ? हे एकदा कळले म्हणजे   अशा एक नव्हे अनेक निवडणुकीत अनेकवेळा हॅट्रिक   करता येईल. पानीपतच्या लढाईतून बोध घेऊन विरोधकांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे," असे आवाहन मंत्री रावते यांनी यावेळी केले.
संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले,  विरोधकांनी कितीही हल्ले केले, तरी शिवसेना डगमगणार नाही. कोल्हापूरमध्ये सेनेमध्ये गट-तट नाहीत . 

.आमदार क्षीरसागर म्हणाले, " आंदोलनाच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सध्या कोल्हापुरात दबावाचे राजकारण सुरू आहे. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, त्याला न घाबरता मी आणि माझे कार्यकर्ते अन्यायाविरोधात लढत राहू, "असे त्यांनी सांगितले. तसेच माझ्याविरोधात घोसाळकर कोण होणार आहे, हे ही आता कळून येईल असे आमदार क्षीरसागर म्हणाले आणि  कार्यकर्त्यांनी त्यांना उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.

उपनेते बानुगडे-पाटील यांचेही यावेळी भाषण झाले . . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख