सरकार मागेपुढेही स्थापन होईल, पण शेतकरी महत्वाचा - दिवाकर रावते

दोन-चार दिवस मागेपुढे सरकार स्थापन होईल. सत्तेपेक्षा सद्यःस्थितीत उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी महत्त्वाचा आहे. त्याला आधार, दिलासा देणे, त्याच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे, असे परिवहन मंत्री दिवाकरराव रावते म्हणाले.
सरकार मागेपुढेही स्थापन होईल, पण शेतकरी महत्वाचा - दिवाकर रावते

अमरावती - दोन-चार दिवस मागेपुढे सरकार स्थापन होईल. सत्तेपेक्षा सद्यःस्थितीत उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी महत्त्वाचा आहे. त्याला आधार, दिलासा देणे, त्याच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे, असे परिवहन मंत्री दिवाकरराव रावते म्हणाले.

अवेळी पावसाने शेती पिकांच्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर बैठकीसाठी आलेल्या रावतेंच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे विभागीय उपायुक्त गजेंद्र बावणे यांना नुकसानाचे पंचनामे तातडीने करावे व शेतकऱ्यांना मदत द्यावी, यांसह विविध मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले. त्यानंतर श्री. रावते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे. वेगवेगळ्या विभागांत नुकसानाची वेगवेगळी परिस्थिती आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देशात सोयाबीन, कपाशी, ज्वारीचे पूर्ण पीक उद्‌ध्वस्त झालेले आहे. पिकांना कोंब फुटत आहेत. ही स्थिती स्वतः शेतात जाऊन प्रत्यक्ष बघितली. कोकणात सोंगलेल्या भाताची नासाडी; तर नाशिक, धुळे जिल्ह्यात बागायती शेतीचे नुकसान झालेले आहे.

सरकारतर्फे शेतकऱ्यांना जी मदत दिली जाईल, त्यापैकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने देण्यात यावी. पीकविमा काढणाऱ्या व न काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यासुद्धा सरकारने सोडविणे आवश्‍यक आहे. काही भागांत शेतकऱ्यांनी नष्ट पीक शेतातून काढून टाकलेले आहे. त्याची छायाचित्रे उपलब्ध असल्याने मदतीसाठी तीसुद्धा ग्राह्य धरावीत, त्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीला निवेदनाद्वारे अवगत करण्यात आले होते, असेही श्री. रावते यांनी सांगितले.

नुकसानीचे पंचनामे तातडीने व्हावेत, यासाठी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याची व सर्वेक्षणाला गती देण्याची सूचना प्रशासनास देण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्तांशी याबाबत संपर्क साधला जाईल, असे सांगत श्री. रावते यांनी सरकार स्थापनेच्या प्रश्‍नावर भाष्य करण्याचे टाळले. सरकार स्थापण्याच्या घडामोडी सुरू असताना शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते, मंत्री मुंबईबाहेर आहेत, असा प्रश्‍न परिवहनमंत्र्यांना केला असता, मी नेता नव्हे कार्यकर्ता आहे. सत्ता हा विषय आज आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, एवढेच श्री. रावते म्हणाले. 

यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार नितीन देशमुख, आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार गोपीकिसन बाजोरिया, संजय गायकवाड, प्रा. श्रीकांत देशपांडे, माजी आमदार विश्वास नांदेकर, ज्ञानेश्‍वर धाने पाटील, संजय गावंडे, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, नगरसेवक दिनेश बूब उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com