बसपा-बहुजन आघाडीमुळे मतविभाजनाचा धोका

शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे विद्यमान शिवसेनेच्या खासदार भावना गवळी याच तिसऱ्यांदा युतीच्या उमेदवार असतील, हे नक्‍की आहे. कॉंग्रेस पक्षाकडून अनेक नावे चर्चेत असली तरी कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गळ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी पडण्याची शक्‍यता आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीने एकटीच वाटचाल करीत प्रवीण पवार यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
Bhavana Gavli- Manikrao Thakre - Pravin Pawar
Bhavana Gavli- Manikrao Thakre - Pravin Pawar

यवतमाळ : या लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पारंपरिक मतांचे विभाजन हेच प्रमुख राजकीय पक्षांसमोरचे मुख्य आव्हान ठरले आहे. यावेळीही वंचित बहुजन विकास आघाडी व बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांकडून मतांच्या विभाजनाचा धोका आहे. ते किती मते घेतात यावरच आघाडी आणि युतीच्या उमेदवारांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे विद्यमान शिवसेनेच्या खासदार भावना गवळी याच तिसऱ्यांदा युतीच्या उमेदवार असतील, हे नक्‍की आहे. कॉंग्रेस पक्षाकडून अनेक नावे चर्चेत असली तरी कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गळ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी पडण्याची शक्‍यता आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीने एकटीच वाटचाल करीत प्रवीण पवार यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. तर, बहुजन समाज पक्षचाही उमेदवार राहणार आहेच. या दोन उमेदवारांमुळे होणारे मतविभाजन कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच धोकादायक ठरण्याची शक्‍यता आहे.

भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते कडवटपणा विसरून किती जोमाने काम करतात यावर भावना गवळींच्या मतांची टक्‍केवारी अवलंबून असेल. शिवाय, शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात महसूल राज्यमंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष हा मुद्दा आहेच. मातोश्रीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित काम करण्याचे आदेश त्यांना दिल्याचे कळते. तसे होणे युतीच्या उमेदवारासाठी फलदायक ठरेल. पण, तरीही 'इनकम्बन्सी'चा धोका नाकारता येत नाही.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोरचे मोठे आव्हान कॉंग्रेसमधील नेता-संघर्ष हाच आहे. कॉंग्रेसमध्ये ठाकरेंसोबतच शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, वसंत घुईखेडकर असे अनेक नेते प्रभावशाली आहे. पण ते एकदिलाने एकत्र येत नाही, हीच खरी समस्या आहे. त्यावर उपाय कसा शोधला जातो, यावरच माणिकराव निवडणुकीत कुठवर मजल मारतील, हे अवलंबून असेल. या मतदारसंघात बंजारा व मराठा-कुणबी समाजाची भूमिका निर्णायक आहे. युती व आघाडीचे दोन्ही संभाव्य उमेदवार मराठा (कुणबी) आहेत. त्यामुळे त्या समाजाच्या मतांचे विभाजन अटळ आहे.

बंजारा समाजावर सध्या पुसदचे नाईक घराणे व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा प्रभाव आहे. आपापल्या परंपरागत मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करावे लागणार आहे. कारण बहुजन वंचित विकास आघाडीचा उमेदवारही बंजारा मतांमध्ये आपला दावा ठोकेलच. अशातच बसपाचा उमेदवार कोण राहील, यावर या मतांच्या विभाजनाची तीव्रता आणखी अवलंबून राहणार आहे.

प्रश्‍न मतदारसंघाचे
- वर्धा-नांदेड-रेल्वेमार्गाचे काम कासवगतीने
- अपूर्ण सिंचन प्रकल्प
- दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी त्रस्त
- कापसावर आधारित प्रकल्पांची वानवा
- उद्योगांचा अनुशेष व बेरोजगारी

2014 चे मतविभाजन
- भावना गवळी (शिवसेना) : 4,77,905
- शिवाजी मोघे (कॉंग्रेस) : 3,84,089
- बळीराम राठोड (बीएसपी) : 48,981
- राजू पाटील राजे (मनसे) : 26,194

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com