लढाई सुरु होण्यापूर्वीच जयंत पाटील यांच्या विरोधकांत फूट !

आता जयंत विरोधकांतील प्रत्येकाला मीच जयंत पाटलांच्या विरोधात मोठी लढत उभी करु शकतो असे वाटू लागले आहे.
Jayant_Patil_Nishikant Patil
Jayant_Patil_Nishikant Patil

इस्लामपूर : वाळवा तालुक्‍यातील जयंत पाटील विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन आगामी रणनिती काय असेल याचे संकेत दिले. या भेटीने जयंत पाटील विरोधकांनी जयंत पाटील व निशिकांतदादा या दोघांनाही योग्य तो मेसेज देण्याचा प्रयत्न केल्याची आज चर्चा सुरु झाली. जयंत पाटलांच्या बरोबर अलिकडे भाजपच्या झेंड्या खाली सुसाट असलेल्या निशिकांत पाटलांनाही हा इशारा असल्याचे बोलले जाते.

गेल्या पाच वर्षात केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर वाळवा तालुक्‍यातील विरोधक दंडाच्या बेडक्‍या फुगवून आहेत. या पुर्वी जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण हा निवडणूक घोषित झाली तरी संशोधनाचा विषय असायचा. मात्र आता जयंत विरोधकांतील प्रत्येकाला मीच जयंत पाटलांच्या विरोधात मोठी लढत उभी करु शकतो असे वाटू लागले आहे. जयंत पाटील यांच्या विरोधात टक्कर द्यायची असेल तर वाळवा तालुक्‍यातील सर्व विरोधकांनी एकत्र येवून एकदिलाने, एकमुखाने लढायला हवे. नेमका याचाच विसर विरोधकांना पडला आहे. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील व सदाभाऊ खोत यांच्यातील अबोल्यानंतर तालुक्‍यातील विरोधकांची मोळी ढिली झाली आहे. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अलिकडे भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन आपणच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असणार असे म्हणून तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनाही ही जागा शिवसेना जिंकू शकते असा आत्मविश्‍वास आला आहे. सदाभाऊ खोत यांनी अलीकडे निशिकांतदादा यांना वगळून इतर सर्वांना पंखाखाली घेत काम सुरु ठेवले आहे. 

नगरपालिका निवडणूकीनंतर इस्लामपुरातील विरोधकांची जी हवा होती ती आता हळूहळू अंतर्गत मतभेदामुळे कमी होऊ लागली आहे. जयंत पाटील यांनी यावर बारकाईने लक्ष देत यातील काहीजणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हाताळत हातात सुई घेऊन अनेकजणांची हवा काढण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केला आहे. यामुळे सर्वच विरोधकांना मीच योग्य, मीच लढणार असा साक्षात्कार होऊ लागला आहे. तर काहींनी येणाऱ्या विधानसभा निवडणूकीअगोदर तालुक्‍यातील जयंत पाटील विरोधक एकत्र बसून एक उमेदवार ठरवतील असे सुतोवाच केले आहे. 

नगराध्यक्ष पदानंतर डायरेक्‍ट विधानसभेला दावेदार झालेल्या निशिकांत पाटलांना विरोधकांनी बाजूला करत आपले कामकाज सुरु ठेवले आहे. यातूनच त्यांनी सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट तालुक्‍यातील विकासकामांसदर्भात होती असे सांगण्यात आले असले तरी त्यातून जयंत पाटील व निशिकांतदादा यांना योग्य तो संदेश देण्यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचे बोलले जाते. अजून विधानसभा निवडणूकीला अडीच ते तीन महिन्याचा कालावधी बाकी असला तरी प्रत्येकजण आपले महत्व वाढवून घेण्यात मश्‍गुल आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com