discussion on central kitchen in kolhapur | Sarkarnama

'सेंट्रल किचन'चा प्रयोग हा तर भाजपचा फंड गोळा करण्याचा उद्योग!

युवराज पाटील 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कार्यालयीन प्रस्ताव हाणून पाडला.

कोल्हापूर : सेंट्रल किचनचा प्रयोग ज्या महापालिकांत भाजपची सत्ता आहे तेथे जरूर राबवा कोल्हापूर महापालिकेत हा प्रयोग राबवू देणार नाही. निवडणुकीसाठी फंड गोळा करण्याचा हा उद्योग आहे. सुपारी घेतली आहे का असा सवाल करत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कार्यालयीन प्रस्ताव हाणून पाडला.

मंजूर नामंजूरच्या गदारोळात हा प्रस्ताव मतदानासाठी आला. 30 विरुद्ध 18 अशा मतांनी सत्तारुढ आघाडीने हा प्रस्ताव नामंजूर केला. 

महापालिकेच्या 59 शाळांमधील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना अक्षयपात्र फौंडेशन या संस्थेमार्फत सेंट्रल किचनद्वारे पोषण आहार दिला जाणार होता. तसे पत्र मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिवाने प्राथमिक शिक्षण समितीला दिले होते. त्यानुसार समितीने हा प्रस्ताव मंजूर करून महासभेपुढे आज ठेवला. प्रारंभी कमलाकर भोपळे यांनी यावर चर्चा घडवून आणली. महिला बचतगटाचे ठेकेदार अस्तित्वात असताना दुसऱ्या एखाद्या संस्थेला काम देण्याची काय गरज आहे? मुख्यमंत्री मुंबईत बसून ऑर्डर काढतात याकडे लक्ष वेधले. भोपळे भाजप ताराराणी आघाडीचे सदस्य आहेत. त्यांनी आघाडीच्या विरोधात भुमिका घेतल्याने सत्तारुढ गटाच्या सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. 

आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी खुलासा करताना अक्षयपात्र फौंडेशनच्या पोषण आहाराचा दर्जा उत्तम आहे. बचत गटांकडे सध्या ज्या महिला काम करतात त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांमधील व्यक्तीस अक्षयपात्र संस्था रोजगार देणार आहे. तसे हमीपत्र करारासोबत घेत आहोत, असे सांगितले. रुपाराणी निकम यांनीही अक्षयपात्र संस्थेचा दर्जा अतिशय चांगला असून सर्व सदस्यांनी याचा अभ्यास करावा. आम्हीही नगरसेवक आहोत. बचतगटांचे नुकसान होणार नाही आणि हा प्रस्ताव ना मंजूर करून नुकसान करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

शारंगधर देशमूख म्हणाले, अक्षयपात्र या संस्थेचा प्रस्ताव हा मागवून घेतला गेला आहे. भाजपची जेथे सत्ता आहे तेथे हा प्रस्ताव जरूर राबवावा. एलईडी दिव्यांचा जशी सक्ती केली गेली. तशीच सक्ती अक्षयपात्र या संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. शासनाचा हा आर्थिक घोटाळा आहे. कोणाला तरी अपेक्षा असल्यानेच हा प्रस्ताव ठेवला गेला आहे. निवडणुकीसाठी फंड गोळा करण्याचा हा उद्योग आहे. एलईडी दिव्यांची पहिली सुपारी घेतली गेली आणि दुसऱ्यांना ही सुपारी घेतीगेल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख