Discussion on cabinet reshuffle is only in media - shinde | Sarkarnama

मंत्रीमंडळाच्या फेरबदलाची चर्चा फक्त माध्यमात - शिंदे

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

शिवसेनेचे हे शिष्टमंडळ शिवसेना आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीबाबत चर्चा मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहेत.

शिवसेनेच्या मंत्र्यांची खाती बदलली जाणार नसून मंत्रीमंडळाच्या फेरबदलाची फक्त माध्यमातच चर्चा असल्याचे शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या मंत्र्यांची व प्रमुख नेते, आमदार यांची मातौश्री या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवास स्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू, अामदार प्रकाश सुर्वे, आमदार अजय चौधरी, आमदार शंभुराजे देसाई, राजेश क्षीरसागर आदी उपस्थीत होते. 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आमदारांच्या मतदार संघातील विकास कामांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये विकासनिधी वाटपाची जी विषमता आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत. आमदारांची माफक अपेक्षा आहे. मतदारसंघातील विकास कामांना निधी मिळाला पाहीजे. ज्या लोकांनी निवडून दिले आहेत. त्या लोकांचे प्रश्न सुटले पाहीजेत. त्यासाठीच उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, नाराज आमदारांनी त्यांचे प्रश्नं उद्धव ठाकरेंकडे मांडले आहेत. त्यांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी त्यांचे समाधान केले असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.

शिवसेना मंत्र्यांच्या कामगिरीवर आमदार नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या खांदे पालटाची शक्यता लक्षात घेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. याबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यावेळी म्हणाले, "आमदारांची शिवसेनाच्या मंत्र्यांवर नाराजीचा काहीही विषय नव्हता. भाजपाच्या आमदारांना शिवसेना आमदारापेक्षा जास्त निधी दिला जातो. त्याबद्दल अजून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. मागे मुख्यमंत्रीची भेट घेतली होती. मात्र, आमदारांचे समाधान झाले नाही. शिवसेना सदस्यांची एक समिती नेमण्यात आली असल्याचे स्पष्ट करत ही समिती मुख्यमंत्र्यांची उद्या भेट घेणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

उद्या दुपारी 12 वाजता शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, मुख्य प्रतोद सुनिल प्रभू, शहरी भागातील दोन अामदार प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, आणि ग्रामीण भागातील आमदार शंभुराजे देसाई, राजेश क्षीरसागर आदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. शिवसेनेचे हे शिष्टमंडळ शिवसेना आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीबाबत चर्चा मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख