discussion about ketan tirodkar in kolhapur | Sarkarnama

#MarathaReservation राणे समितीला आव्हान देणारा केतन तिरोडकर कोण? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

निलोफर आजरेकर यांनी, आरक्षणाचे जुने संदर्भ देत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली. मराठा समाजाचे शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण आरक्षणामुळे दूर होईल. कुणाचेही आरक्षण काढून न घेता तमिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावे. त्या दृष्टीने विधानसभेत ठराव करावा, असे अभ्यासपूर्ण मत मांडले. 

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महापालिका सभा आज तहकूब झाली. "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. दरम्यान, पक्षाचे प्रमोशन करू नका. नारायण राणे समितीच्या अहवालाला आव्हान देणारा केतन तिरोडकर कोण?, त्याचा वकील कोण आणि उठबस कुणासोबत असते, याची माहिती दिली तर अडचण निर्माण होईल, अशा शब्दात दोन्ही कॉंग्रेस आणि भाजपच्या गटनेत्यांत शाब्दिक चकमक उडाली. 

सभेनंतर महापौरांच्या नेतृत्वाखाली दोन्ही कॉंग्रेसचे नगरसेवक दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभागी झाले; तर भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी सभागृहात ठाण मांडून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. मागील तहकूब सभेनंतर नियमित सभेच्या कामकाजास सुरुवात होताच प्रा. जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत आजची सभा तहकूब करावी, अशी महापौरांना विनंती केली. 

अशोक जाधव म्हणाले, "मराठा समाजाची झालेली वाताहत पाहता सरकारने अंत पाहू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. प्रसंगी घटनेत तरतूद करावी; पण आरक्षण द्यावे.' भूपाल शेटे यांनी, आरक्षणाची मागणी रास्त आहे. कार्यवाही करावी, अशी मागणी केली. 

रूपाराणी निकम यांनी "मराठ्यांना संघर्षाशिवाय काही मिळाले नाही, असे सांगितले. पालकमंत्री आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजसिंह शेळके यांनी, धनगर समाजालाही आरक्षण मिळावे, अशी मागणी केली. 

विजयसिंह खाडे यांनी, कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण दिले जाईल, असे नमूद केले. विजय सूर्यवंशी यांनी, राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून आरक्षण मागणीला गती दिल्याचे सांगितले. सरकार सकारात्मक असून, मराठा वसतिगृह या सरकारनेच बांधल्याचे त्यांनी सांगताच अर्जुन माने यांनी त्यास आक्षेप घेतला. नुसती आश्‍वासने दिली, पूर्तता किती केली? असा सवाल केला. शारंगधर देशमुख यांनी आक्षेप घेत पक्षाचे प्रमोशन करू नका. आरक्षण हा मराठ्यांचा अधिकार असल्याचे सांगितले. 

प्रा. जयंत पाटील यांनी नारायण राणे समितीने आरक्षणाचा अहवाल दिला, त्यास केतन तिरोडकर याने न्यायालयात आव्हान दिले. त्याचा वकील कोण? त्याची उठबस कुणासोबत असते हे सांगितले तर अडचणी निर्माण होतील, असे सांगून आरक्षणाच्या पाठिंब्यासंबंधी बोला, अशी सूचना केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख