disappointment in pn and abitkar faction in kolhapur  | Sarkarnama

पी. एन., अबीटकर गटात अस्वस्थता, नाराजी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 डिसेंबर 2019

राज्याच्या मंत्रिमंडळात डावलले गेल्याने कॉंग्रेसचे निष्ठावंत आमदार पी. एन. पाटील व शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश अबीटकर यांच्या गटात अस्वस्थता आणि नाराजी पहायला मिळाली.

कोल्हापूर ः राज्याच्या मंत्रिमंडळात डावलले गेल्याने कॉंग्रेसचे निष्ठावंत आमदार पी. एन. पाटील व शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश अबीटकर यांच्या गटात अस्वस्थता आणि नाराजी पहायला मिळाली.

शिवसेनेतून ऐनवेळी श्री. अबीटकर यांच्याऐवजी शिरोळमधून अपक्ष निवडून येऊन शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या राजेंद्र पाटील यांना संधी मिळाल्याने अबीटकर गटात नाराजी आहे. कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणून पी. एन. यांना संधी मिळेल अशी शक्‍यता होती, पण त्यांच्याऐवजी आमदार सतेज पाटील यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याने पी. एन. यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.

तब्बल महिन्यांनी राज्यमंत्रीमंडळाच्या विस्ताराला आज मुहुर्त मिळाला आहे. नव्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार याविषयी मोठी उत्सुकता होती. राष्ट्रवादीतून ज्येष्ठ आमदार हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्‍चित होते, त्यातही कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद त्यांना मिळणार हे निश्‍चित होते. अपेक्षप्रमाणे श्री. मुश्रीफ यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रीमंडळात समावेश झाला.

कॉंग्रेसमध्ये पी. एन. व सतेज पाटील यांच्यात मंत्रीपदासाठी चुरस होती. पक्षाशी निष्ठावंत, अडचणीच्या काळात पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून केलेले काम, त्यातही गांधी घराण्यावर विशेष प्रेम, ज्येष्ठ या निकषावर पी. एन. यांनी जोर लावला होता. पण त्यांना डावलून सतेज पाटील यांना मंत्रीपद देण्यात आल्याने पी. एन. यांच्यासह त्यांच्या गटात अस्वस्थता आहे. सतेज पाटील यांनी यापुर्वी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे, यावेळी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. किंबहुना त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांनाही राज्यमंत्रीपदावरच बोळवण करण्यात आली. कॉंग्रेसमध्ये विधानपरिषद आमदारांना मंत्री पदी संधी फार अपवादात्मक परिस्थितीत दिली जाते. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळवून दिलेली नवसंजिवनी, तरूण चेहरा आणि मजबूत संघटन या जोरावर पक्षाने त्यांना निकष डावलून मंत्रीपदाची संधी दिली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवेसनेने जिल्ह्यातील दहापैकी सहा जागा जिंकल्या, त्यावेळी पक्षाने या जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले. आता श्री. अबीटकर यांच्या रूपाने एकमेव आमदार असताना मंत्री पद देताना मात्र पक्षासोबत प्रामाणिक असलेल्यांना डावलण्या आले. श्री. अबीटकर यांच्यासाठी स्वतः खासदार प्रा. संजय मंडलिक प्रयत्नशील होते, पण त्यांनाही यश आले नाही. याउलट अपक्ष विजयी होऊन शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मंत्रीपदावर संधी दिल्याने प्रामाणिक शिवसैनिकांत नाराजी आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख