dipak salunkhe support shahajibapu patil | Sarkarnama

राष्ट्रवादीचा उमेदवार शिवसेनेला मिळाल्याने शेकापचा गड धोक्यात 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

दीपक साळुंखे हे महिनाभरापुर्वीपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते.

पुणे: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र यावेळी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने तो अडचणीत आला आहे.

गेली 50 वर्षे सांगोला मतदारसंघाचे नेतृत्व आमदार गणपतराव देशमुख यांनी केले आहे. विधानसभेत सर्वाधिकवेळा निवडून जाण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. यंदा वयाच्या 92 व्या वर्षीही त्यांनीच निवडणूक लढवावी, असा समर्थकांचा आग्रह होता, मात्र स्वत: गणपतराव देशमुख यांनीच त्यास नकार दिला. हा मतदारसंघ शेकापच्या ताब्यात राहावा, एवढीच आपली इच्छा असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर शेकापचे उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांचे नाव जाहीर करण्यात आले. मात्र त्यांच्या नावाला जोरदार विरोध झाला. त्यानंतर शेकापने उमेदवार बदलला. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रूपनर शिवसेना उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या साथीला गेले. आज राष्ट्रवादीचे उमेदवार, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शहाजीबापू पाटील यांनी पाठिंबा दिला.

दीपक साळुंखे हे महिनाभरापुर्वीपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र विधानसभा निवडणूक लढवण्याच्या इराद्याने त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते शिवसेनेत जाणार अशा चर्चा होत्या, मात्र त्यांचा प्रवेश झाला नाही. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने दीपक साळुंखे हे आमचे उमेदवार नाहीत, असे जाहीर पत्रक काढले. त्यामुळे दीपक साळुंखे नाराज झाले आणि त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख