पहिल्याच चकमकीत वळसे फडणवीसांना भारी पडले !

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपाचे सदस्य आक्रमकपणे' नही चलेगी, नही चलेगी ,दादागिरी नही चलेगी', अशा घोषणा देत होते.
devendra-fadanvis-dilip-valse
devendra-fadanvis-dilip-valse

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला  संवैधानिक आणिकायदेशीर मुद्दे उपस्थित करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 


परंतु हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहणारे दिलीप वळसे-पाटील हे चांगलाच गृहपाठ करून आलेले दिसले . त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व मुद्द्यांची निराकरण केले आणि आजची बैठक ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कशी योग्य आहे हे सभागृहांमध्ये ठणकावून सांगितले. 


देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात असे म्हणाले की , पहिले अधिवेशन हे पूर्ण झालेले होते . राष्ट्रगीत झाल्यानंतर ते अधिवेशन पूर्ण झाले असे मानले जाते . त्यामुळे आजचे अधिवेशन नवीन अधिवेशन असेल तर राज्यपालांची समन्स हे काढायला हवे. एकदा अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते सहा दिवसापर्यंत स्थगित  ठेवता येते पण  राष्ट्रगीत घ्यायला  नको होते . नवीन अधिवेशन जर तुम्ही घेत आहेत  तर वंदे मातरमने सुरुवात करायला हवी होती . 


श्री.  फडणवीस पुढे म्हणाले , सरकारला जर बहुमताची एवढी खात्री होती त्यांनी आम्हाला रात्री एक वाजता उद्या विश्वासदर्शक ठरावावर मतदानासाठी अधिवेशन बोलवत असल्याचे कळवले नसते .  आमचे सदस्य सभागृहात पोचू नये म्हणूनच तुम्ही उशिरा कळवले का ? कसे यायचे आमच्या सदस्यांनी? हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीनुसार नाही . तुम्हाला रेटून न्यायचे असेल तर न्या . रात्री-अपरात्री ऑर्डर कडून अधिवेशन बोलावता येत नाही. 


फडणवीस पुढे म्हणाले ,  सत्तावीस तारखेला झालेला अधिवेशनामध्ये श्री. कोळमकर यांची यांची हंगामी सभापती म्हणून निवड करण्यात आलेली होती. त्यांची  निवड का रद्द करण्यात आली ?  आणि नवीन हंगामी सभापती का निवडण्यात आले ?  देशात लोकसभेत आणि विधानसभेत कुठेही अशा पद्धतीने हंगामी अध्यक्षांना एका दिवसात बदलण्यात  आलेले नव्हते. 


मंत्री मंडळातील सदस्यांनी शपथ घेतली ती सुद्धा घटनेला आणि कायद्याला धरून नाही . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी घेतलेली शपथ चुकली म्हणून त्यांना दुसरी शपथ घ्यावी लागली होती . शपथविधी घेताना  चुका झालेल्या आहेत त्यामुळे श्री मंत्रिमंडळ कसे अस्तित्वात येऊ शकते? 


या सर्व आक्षेपांना उत्तर देताना हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील असे म्हणाले, माननीय राज्यपालांच्या आदेशानुसारच अधिवेशन बोलावण्यात आलेले आहे आणि त्यांच्या आदेशाचा मान सर्वांनी  ठेवला पाहिजे.

 मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळातील सदस्यांनी घेतलेली शपथ ही सभागृहाबाहेर झालेली घटना आहे आणि त्यावर सभागृहामध्ये आता चर्चा करता येणार नाही.  ही घटना विधिमंडळाच्या कार्यकक्षेत  येत नाही तर राज्यपालांच्या कार्यकक्षेत येते त्यावर मी भाष्य करणार नाही. 


श्री. वळसे पुढे म्हणाले, माननीय राज्यपालांनी एका आदेशाद्वारे  माझी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे  आणि त्यानुसारच मी काम करत आहे.  आणि हे काम सर्व नियमानुसार होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा काही भाग यावेळेस दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहामध्ये वाचून दाखवला .

त्यांनतर श्री . वळसे पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील सत्ताविसाव्या परिच्छेदात   सरकार स्थापनेमध्ये घोडेबाजार होऊ नये आणि लोकशाहीचे कामकाज सुरळीतपणे चालावे हे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे . आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच फ्लोअर  टेस्ट घेण्यात येत आहे. 

 सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आम्ही अवलंब  करत आहोत . सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणेच आम्ही खुले मतदान घेणार आहोत.  त्याचप्रमाणे ही सर्व प्रक्रिया आपण लाईव्ह टेलिकास्ट करून सर्वसामान्यांना दाखवत आहोत. 

दिलीप  पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये कायदेशीर मुद्द्यांवरून दोन-तीन वेळा शाब्दिक चकमक उडाली . पॉईंट ऑफ ऑर्डर आणि पॉईंट ऑफ प्रोसिजरचे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करून पहिल्या मिनिटांपासून सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले . परंतु दिलीप वळसे यांनी सर्व प्रश्न निकाली निघाले असल्याचे जाहीर केले . 


सभागृहांमध्ये गोंधळ सुरू असताना दिलीप वळसे-पाटील उभे राहिले आणि त्यांनी सर्व सदस्यांना  पाच वेळा सांगितले की,  मी उभा राहिलो आहे .  आणि मग नंतर असे सांगितले की मी उभा राहिल्यावर आपण खाली बसले पाहिजे असा नियम आहेत . त्यामुळे आता तुम्ही बसून घ्या आणि मी जे सांगतो ते ऐका. 


वळसे पाटील यांनी आपला सर्व अनुभव पणाला लावून सभागृहाचे कामकाज हाताळले. वळसे बोलत असतानाही भारतीय जनता पक्षाचे सदस्य आक्रमकपणे घोषणा देत होते . परंतु    वळसेंनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, मी तुम्हाला बोलण्याची परवानगी देतो, पण आधी तुमच्या मागे सदस्य बोलत आहेत आणि घोषणा देत आहेत , त्यांना शांत बसायला सांगा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com