dilip patil about sangramsinh deshmukh and vishal patil | Sarkarnama

संग्रामसिंह देशमुख, विशाल पाटील सांगलीच्या राजकारणातील पोकळी भरतील!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

'सरकारनामा'चा पहिलाच दिवाळी अंक राजकारणातील नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल!

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांना राजकारणात मोठे भवितव्य आहे. ते जिल्ह्यातील राजकीय पोकळी भरून काढतील, असा विश्‍वास जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज व्यक्त केला. 

'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' या दिवाळी अंकाचे प्रकाशन सकाळ सांगली विभागीय कार्यालयात झाले. या तीन मान्यरांसह महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक उदय देशपांडे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे नेते विकास सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते. 

दिलीपतात्या म्हणाले, 'सरकारनामा'तील लेखन लक्षवेधी असते. राज्यभरातील पडद्याआडच्या गोष्टी प्रकाशात आणल्या जातात. काम करणाऱ्यांना पाठबळ मिळते. आमच्यावर लिहलेले बारकावे वाचणे हा अनुभव सुखावह असतो. आम्ही तिघे वेगळ्या पक्षात असलो तरी एका विचाराचे आहोत. विशाल पाटील यांचे पाय आता स्थिर झालेत. ते राजकारण करायला मोकळे आहेत. वसंतदादा कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी राजकीय परिणामांची मी तमा बाळगली नाही. त्याचे फळ हजारो कामगार, शेतकऱ्यांना मिळतेय, यातच समाधान आहे. संग्रामसिंह हे सुसंस्कृत नेते आहेत. चांगला सहकारी कसा असावा, हे त्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील राजकीय पोकळीत या दोन्ही युवा नेत्यांना मोठे भवितव्य आहे.'' 

श्री. संग्रामसिंह म्हणाले, "दिलीपतात्या गुरु आहेत. सर्व घटकांवर त्यांची छाप आहे. जिल्हा बॅंक, जिल्हा परिषदेत मी प्रामाणिक काम करतोय. या कामाची दखल सरकारनामाने घेतली, ही आनंददायी गोष्ट आहे. या अंकातून नव्या पिढीला दिशा मिळेल.'' 

श्री. विशाल पाटील म्हणाले, "इंटरनेटच्या जमान्यात वृत्तपत्रांची विश्‍वासार्हता सर्वाधिक आहे. 'सरकारनामा' नियमित इंटरनेटवर आम्ही वाचतो, मात्र हा दिवाळी अंक सुटीच्या काळात नवा विचार देणारा ठरेल. विचारमंथन होईल.'' श्री. साखळकर म्हणाले, "सरकारनामा अंकाचा राजकीय अभ्यासाला फायदा होईल.''  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख