दिगंबर आगवणेंनी विषारी औषध घेतल्याने फलटणमध्ये राडा  

दिगंबर आगवणे हे फलटण येथील स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष असून 2014 मधील विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून लढविली आहे.
दिगंबर आगवणेंनी विषारी औषध घेतल्याने फलटणमध्ये राडा  

सातारा : फलटणमधील दिगंबर आगवणे यांच्या उपोषणाला काल रात्री हिंसक वळण लागले. पोलिसांनी लाठीहल्ला करीत आंदोलन उधळून लावल्याचा आरोप करत आगवणे यांनी विषारी औषध पिले. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. यामध्ये पोलिस निरिक्षकासह पाच पोलिस जखमी झाले. आगवणे यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

17 नोव्हेंबरपासून आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दिगंबर आगवणे हे फलटण प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. यातील काही मागण्या पोलिसांनी मान्य केल्या. पण लोणंद (ता. खंडाळा) येथील एका गुन्ह्यात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून श्री. आगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा दम अधिकाऱ्यांना देत असल्याचे श्री. आगवणे यांचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी स्टेशन डायरीची नोंद माहितीच्या अधिकारात मागविली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सभापती रामराजेंवर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली होती. पण त्यांची मागणी पोलिस मान्य करत नव्हते. मात्र, आगवणे या मुद्‌द्‌यावर ठाम राहून उपोषण सोडण्यास तयार नव्हते. 

काल रात्री फलटणमध्ये जोरदार राडा झाला. उपोषणाच्या सहाव्यादिवशी आगवणे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिला. त्या अहवालाच्या आधारे आगवणे यांना कोणत्याही परिस्थितीत रूग्णालयात दाखल करण्याच्या तयारीने पोलिस फौजफाट्यासह आले. त्यांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मध्यरात्री हा सर्व प्रकार सुरू असताना पोलिसांच्या कृतीचा निषेध करणारी सुसाइड नोट लिहित आगवणे यांनी स्वत:च्या गाडीत विषारी औषध पिले. ही गोष्ट कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. 

आगवणे यांनी विष पिल्याचे समजताच त्यांचे कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी फलटण शहर पोलिस ठाण्यात आले. त्यांची पोलिसांसोबत वादावादी सुरू झाली. काहींनी दगडफेक केल्याने कार्यकर्त्यांची पळापळी सुरू झाली. दगडफेकीत पोलिस निरिक्षक प्रकाश सावंत, सहायक निरिक्षक संदीप शिंगटे, उपनिरिक्षक काळे, हवालदार मुठे जखमी झाले. या प्रकारामुळे दिवसभर फलटण शहरात तणावपूर्ण वातावरण होते. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी फलटणला येऊन आढावा घेतला. या हल्ल्याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षक पल्लवी काळे यांनी फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मनोहर आगवणे, दत्तात्रेय आगवणे, सोमनाथ टोणपे, यांना अटक करण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com