इस्लामपूरमधील 'कोरोना' महत्वाचा की इस्लामपूरच्या पाटलांमधील 'इगो'?

जयंत पाटील यांची बैठक शहर नियोजनासाठी होती, मात्र त्याला नगराध्यक्षांनाच बोलावण्यात आले नसल्याने साऱ्यांनीच आश्‍चर्य व्यक्त केले आहे.
differences between jayant patil and nishikant patil seen in official meeting
differences between jayant patil and nishikant patil seen in official meeting

सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी इस्लामपूर येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. इस्लामपूर शहरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. पण, जयंतरावांनी या बैठकीला शहराचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना मात्र बोलावले नाही. त्यामुळे एकेकाळी जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले आणि आता मुख्य विरोधक मानले जात असलेले निशिकांत पाटील नाराज झाल्याची चर्चा आहे. 

इस्लामपूर शहरात एकाच कुटुंबातील 22 जण आणि त्यांच्या घरातील 3 मोलकरणींना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरात भितीचे वातावरण आहे. औषध फवारणी सुरु आहे. शेकडो लोकांनी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांनी आपल्या होम पीचवर तळ ठोकला आहे. शहरात अधिकाधिक दक्षता घेतली जात आहे, मात्र या साऱ्यात तेथील स्थानिक राजकारणही तापले आहे. जयंत पाटील यांची बैठक शहर नियोजनासाठी होती, मात्र त्याला नगराध्यक्षांनाच बोलावण्यात आले नसल्याने साऱ्यांनीच आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 

निशिकांत पाटील हे एकेकाळी जयंतरावांचे कट्टर समर्थक होते. तीन वर्षापूर्वी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणूकीत त्यांनी जयंतरावांच्या विरोधात बंड केले. थेट नगराध्यक्ष निवडीसाठी ते मैदानात उतरले आणि जयंतरावांच्या कट्टर समर्थकाचा पराभव करत नगराध्यक्ष झाले. तेवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी लागलीच भाजप प्रवेश केला आणि जयंतरावांच्या विरोधात आघाडी उघडली. माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि निशिकांत यांनी जयंतरावांवर सतत हल्ले चढवले. पुढे सदाभाऊंशी निशिकांत यांचे फाटले, मात्र विरोधक जयंतरावच राहिले. निशिकांत यांनी विधानसभा निवडणुक लढवत जयंतरावांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. तो फसला, मात्र त्यांचे राजकीय इरादे स्पष्ट झाले. तेंव्हापासून निशिकांत आणि जयंतरावांमध्ये संघर्ष वाढलाच. 

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर जयंतरावांनी मैदानात उतरून काम सुरु केले. त्याचवेळी निशिकांत यांनीही कंबर कसली, मात्र दोघांत संवाद काही झाला नाही. निशिकांत यांनी या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे मदत मागितली, मात्र जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला नाही. त्यातच आता जयंतरावांनीही त्यांना बैठकीला डावलल्याने चर्चा तापली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com