बदलापूरमध्ये महाविकास आघाडीवरून राष्ट्रवादीतच बिघाडी

पुढील महिन्यात कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. बदलापुरात मात्र राज्यातील आघाडीच्या विरोधातील चित्र कायम आहे. महाविकास आघाडी आकार घेऊन चार महिने लोटल्यानंतरही बदलापूर पालिकेत सत्ताधारी शिवसेनेने भाजपला सत्तेतून दूर केलेले नाही
Diffreneces in Badlapur NCP over Formation of MahaVikasAghadi
Diffreneces in Badlapur NCP over Formation of MahaVikasAghadi

बदलापूर  : येत्या नगरपालिका निवडणुकीत बदलापूर शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे; तर शहरात पक्षवाढीसाठी चांगले वातावरण असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये 'इनकमिंग'चा कार्यक्रम शहर अध्यक्षांनी सुरू ठेवला आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढल्याने आघाडी झाल्यास नव्याने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह कमी होण्याची शक्‍यता शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केली आहे. 

महाविकास आघाडीच्या मागणीऐवजी पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहू, असा पवित्रा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आशीष दामले यांनी घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवरून राष्ट्रवादीतच बिघाडी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील विविध पालिका, महापालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषदा आणि इतर छोट्या-मोठ्या निवडणुकांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत आहेत. 

पुढील महिन्यात कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. बदलापुरात मात्र राज्यातील आघाडीच्या विरोधातील चित्र कायम आहे. महाविकास आघाडी आकार घेऊन चार महिने लोटल्यानंतरही बदलापूर पालिकेत सत्ताधारी शिवसेनेने भाजपला सत्तेतून दूर केलेले नाही. आजही शिवसेनेचे नगराध्यक्ष अॅड. प्रियेश जाधव यांच्यासोबत भाजपच्या राजश्री घोरपडे उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान आहेत. त्यामुळे बदलापूर शहरात आजही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा थेट सामना पाहायला मिळतो आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आणि गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेना आणि भाजपतील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बदलापूरचे माजी शहर अध्यक्ष आणि प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे, बदलापूर शहरात महाविकास आघाडी करण्यासाठी पत्र दिले आहे. 

मात्र त्यांच्या या मागणीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच बिघाडी असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे शहर अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांचा गट शिवसेना आणि भाजपतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देत आहेत; तर दुसरीकडे देशमुख यांनी महाविकास आघाडीची मागणी केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकवाक्‍यता नसल्याचे चित्र आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

पालिकेत भाजप-शिवसेना एकत्र

राज्यात भाजपला दूर करण्यासाठी महाविकास आघाडी आकाराला आली. बदलापूर पालिकेत मात्र आजही शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे. आम्ही सध्या पक्षवाढीसाठी काम करतो आहोत. वरिष्ठांनी आदेश दिल्यास आघाडी करू, मात्र तोपर्यंत पक्षवाढीसाठीच काम करणार. काही वर्षानंतर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपबाबत नाराजी वाढत आहे. त्याचा लाभ घेऊन पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न करीत आहोत. पक्षाचे वरिष्ठ नेतेही आपल्या या प्रयत्नांना प्रतिसाद देत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तथा गटनेते कॅप्टन दामले यांनी सांगितले.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेसची सत्ता आहे. या सत्तेचा लाभ शहराला व्हावा यासाठी आपण पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. महाविकास आघाडी झाल्यास पक्षाचे नगरसेवक जास्त निवडून येतील, असा विश्वास आहे- कालिदास देशमुख, प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com