'डीड यू नो?' शिवसेनेला बूमरँग

'डीड यू नो?' शिवसेनेला बूमरँग

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने "डीड यू नो?' ही कॅचलाईन घेऊन अनोखा प्रचार सुरू केला आहे. पालिकेने केलेल्या चांगल्या कामांची जाहिरात या माध्यमातून शिवसेनेकडून केली जात आहे. मात्र, ही जाहिरातबाजी शिवसेनेसाठी बूमरॅंग ठरण्याची शक्‍यता आहे. कारण " डीड यू नो ?' ही कॅचलाईन घेत विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका करायला सुरवात केली आहे.

मुंबई महानगरपालिकेत गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीतही मुंबईचे "तख्त' राखण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विशेष कामांची माहिती मतदारांना व्हावी आणि पर्यायाने पक्षाची प्रतिमा उजळावी, या हेतूने शिवसेनेने रणनीती आखली आहे. "डीड यू नो?' असा प्रश्‍न विचारणारे होर्डिंग्ज मुंबईतील मोक्‍याच्या ठिकाणी लावण्यात आली आहेत. यावर विक्रमी वेळेत पालिकेने पूर्ण केलेला मध्य- वैतरणा धरणाचा प्रकल्प, पाच वर्षांत तयार केलेली 700 उद्याने, पालिका शाळांमधील ई- लर्निंग अशा अनेक योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविली जात आहे.

शिवसेनेने सुरू केलेल्या या जाहीरातीलला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी मुंबई कॉंग्रेसने शक्कल लढविली आहे. पथनाट्याच्या माध्यमातून पालिकेतील 900 कोटींचा रस्ते घोटाळा, पेंग्विनच्या मृत्यूवरुन झालेला वाद, मुंबईतील अस्वच्छता अशा अनेक समस्यांचा पाढाच कॉंग्रेसकडून वाचला जाणार आहे. या पथनाट्यात पालिकेतील गैरकारभारावर बोट ठेवत मतदारांना " डीड यू नो?' हाच प्रश्‍न उपरोधिकतेने कॉंग्रेसकडून विचारला जाणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमधील वस्त्यांमध्येच दररोज या पथनाट्याचे खेळ करण्याबरोबरच टीकेची धार अधिक तीव्र केली जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही काही ठिकाणी होर्डिंग्ज लावत या " डीड यू नो ? चा समाचार घेतला आहे. मुंबईतील खड्ड्यांची समस्या किती तीव्र आहे, याची माहिती होती का? असा सवालच राष्ट्रवादीने होर्डिंगच्या माध्यमातून विचारला आहे.


गेल्या पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने " करून दाखवलं' ही कॅचलाईन प्रचारासाठी बनविली होती. तेव्हाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक विरोधकांनी यावरून शिवसेनेची खिल्ली उडविली होती. यंदाच्या निवडणुकीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले हे "डीड यू नो' शिवसेनेलाच डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com