dhule : March by organisations to suppor MP gavit | Sarkarnama

हीना गावितांवरील हल्ला प्रकरणी उद्या निषेध मोर्चा; संघर्ष वाढण्याची चिन्हे

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांकडून भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे 14 ऑगस्टला धुळ्यात मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध आदिवासी, बहुजन, असा नवा संघर्ष निर्माण होत असल्याचे चिन्ह आहे. 

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांकडून भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे 14 ऑगस्टला धुळ्यात मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध आदिवासी, बहुजन, असा नवा संघर्ष निर्माण होत असल्याचे चिन्ह आहे. 

एकलव्य भिल्ल सेनेचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाई धुळकर, जिल्हाध्यक्ष अंकुश सोनवणे, विभागीय अध्यक्ष ऍड. राजन वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की खासदार गावित यांच्या कारवर झालेल्या हल्ला प्रकरणी आदिवासी आणि बहुजन समाजात चीड निर्माण झाली आहे. हल्ला करून मराठा क्रांती मोर्चाचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप आहे. आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाला पाठिंबाच आहे. त्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. त्यांचे कार्य पुढची पिढी स्मरणात ठेवेल.

 इतरांना सोडून गावितांवर हल्ला 

खासदार गावित या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी झालेल्या ठरावाच्या बाजूने होत्या. असे असताना आदिवासी समाजाच्या महिला खासदार आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 
"ऍट्रॉसिटी'चा दुरुपयोग करण्याविषयी आरोप होतात. भांडणे करायला आम्ही कुणाला निमंत्रण देत नाही. आदिवासी समाज कष्टकरी, शोषित आहे. तो चरितार्थासाठी सवर्णांच्या शेतात राबतो. त्यामुळे तो स्वतःहून कधीही भांडत नाही. मात्र, धुळ्यात पाच ऑगस्टला इतर लोकप्रतिनिधींना सोडून खासदार गावित यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. 

हल्लेखोरांची मिरवणूक 
हल्ला झाल्यावर काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. तेव्हा कुस्ती मारून आल्यासारखी हल्लेखोरांची मिरवणूक काढली गेली. खासदार गावित यांच्याविषयी सोशल मिडियावर नाही- नाही त्या "कॉमेंट' झाल्या. त्यामुळे शांततेत मोर्चाद्वारे निषेध व्यक्त केला जाईल. नवी दिल्लीत संविधान जाळल्याच्या घटनेचा निषेध करत असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी मोर्चातून केली जाईल. 

तडजोड केल्यास गुन्हा 
मराठा आंदोलकांबाबत दाखल गुन्ह्यात तडजोडीचा प्रयत्न खासदार गावित यांच्याकडून झाल्यास, गुन्हा मागे घेण्याबाबत प्रयत्न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याविषयी विचार करू, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

22 आंदोलक अटकेत 

हल्ला प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत मराठा क्रांती मोर्चाने दोषींना पाठीशी घालणार नाही, असे सांगत खासदार गावित यांनी शहर पोलिस ठाण्यात राजकीय दबावाला बळी पडत खोटा गुन्हा दाखल केला, पदाचा गैरवापर करत "ऍट्रॉसिटी'चा आधार घेतला, असा आरोप पत्रकार परिषदेतून केला होता. मराठा आणि आदिवासी समाजात सलोख्याचे संबंध असताना कुणी दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू, अशी भूमिकाही क्रांती मोर्चाने मांडली होती. या प्रकरणी 22 आंदोलकांना अटक झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख