dhule maratha activist arrest news about heena gavit | Sarkarnama

धुळ्यात अटकेतील 22 मराठा आंदोलकांसाठी 150 वकिलांची फौज 

निखिल सूर्यवंशी 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

धुळे ः जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी 22 मराठा आंदोलकांना अटक झाली. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी कामकाज होणार आहे. त्यासाठी मराठा- पाटील समाजासह अन्य समाजाच्या 150 वकिलांनी वकीलपत्र भरले आहे. त्यामुळे कामकाजाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

धुळे ः जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी 22 मराठा आंदोलकांना अटक झाली. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी कामकाज होणार आहे. त्यासाठी मराठा- पाटील समाजासह अन्य समाजाच्या 150 वकिलांनी वकीलपत्र भरले आहे. त्यामुळे कामकाजाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पाच ऑगस्टला रविवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. त्याचदिवशी आरक्षणप्रश्‍नी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा 16 वा दिवस होता. बैठकीतून बाहेर पडल्यावर खासदार गावित यांची कार रोखण्याचा काही मराठा आंदोलकांचा प्रयत्न होता.

यात पोलिस आणि आंदोलकांच्या रेटारेटीत प्रवेशव्दार उघडले. काही आंदोलक खासदार डॉ. गावित यांच्या कारच्या छतावर चढले. कारचे नुकसान झाले. कारमध्ये खासदार डॉ. गावित असल्याचे कुणालाही माहीत नव्हते, असा दावा करत आंदोलकांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, खासदार डॉ. गावित यांनी शहर पोलिस ठाण्यात आंदोलकांकडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्यासंबंधी गुन्हा दाखल केला. 

लोकसभेत उमटले पडसाद 
कमी पोलिस व ते बघ्याच्या भूमिकेत होते. घटनेतून बचावले, अन्यथा मृत्यू झाला असता. संशयितांची सायंकाळी सुटका झाली. त्यांच्यावर "ऍट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल व्हावा, अशी भूमिका खासदार गावित यांनी दुसऱ्यादिवशी लोकसभेत मांडली. पोलिसांनी चौघा आंदोलकांना अटक करत "ऍट्रॉसिटी'चे कलम वाढविले. 

मराठा आंदोलकांचा पलटवार 
खासदार गावित यांनी पदाचा गैरवापर करत जीवे ठार मारण्यासह "ऍट्रॉसिटी'चा खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप करत त्यांनी तो सिद्ध केल्यास आपापल्या राजकीय पक्षासह क्रांती मोर्चाला सोडचिठ्ठी देऊ, अशी भूमिका मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे व इतर सहकाऱ्यांनी मांडली. नंतर त्यांच्यासह 18 आंदोलकांनी स्वतःहून अटक करवून घेतली. 

खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष 
संशयितांनी जामिनासाठी अर्ज दाखल केल्याने त्यावर सोमवारी कामकाज आहे. या प्रकरणी तरतुदीनुसार फिर्यादी खासदार गावित यांना बाजू मांडण्याबाबत नोटीसव्दारे सूचीत केले जावे, अशी मागणी आधीच्या कामकाजावेळी ऍड. दिलीप पाटील व सहकाऱ्यांनी केली. ती न्या. क्षीरसागर यांनी ग्राह्य मानली. त्याप्रमाणे तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी खासदार डॉ. हीना गावित यांना त्यांची भूमिका न्यायालयीन कामकाजावेळी मांडली जावी, अशी प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. खासदार डॉ. गावित या सोमवारी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

कायदेशीर लढाई ः ऍड. पाटील 
धुळे वकील संघाने मराठा आंदोलनास पाठिंबा दिला आहे. संघाचे अध्यक्ष ऍड. दिलीप पाटील म्हणाले, की ज्यांच्याकडून न्यायाची, समाजाचे रक्षण व भले करण्याची अपेक्षा आहे. त्यांनी खोटा गुन्हा दाखल करावा, "ऍट्रॉसिटी'चा आधार घ्यावा हे समर्थनीय नाही. संशयित 22 मराठा आंदोलकांना न्याय मिळण्यासाठी कायदेशीर लढाई केली जाईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख