धुळे जिल्हा : मंत्र्यांचा लागणार खरा कस!

कॉंग्रेसचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त करून धुळे जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे या पक्षाच्या नेत्यांनी रचले आहेत. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यांच्यात तिकीट वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. या हालचालींमुळे भाजपमधील निष्ठावंत, इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही कोंडी भाजपचे खानदेशातील प्रमुख नेते कशी सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळे जिल्हा : मंत्र्यांचा लागणार खरा कस!

धुळे जिल्ह्यातील 2014 मधील विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. तेथे 'मोदी लाटे'चा परिणाम दिसू शकला नाही. शिंदखेडा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, धुळे शहरातून ऐनवेळी भाजपची उमेदवारी मिळविणारे अनिल गोटे आमदार झाले. सद्यःस्थितीत पक्षातील वितुष्टामुळे गोटे यांनी भाजपसह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या पाठोपाठ लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून भाजपचे खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे दुसऱ्यांदा निवडून आले. 

भाजपची घोडदौड कॉंग्रेससाठी चिंतेची
भाजपने या जिल्ह्यातून दोन मंत्रिपदे दिल्याने शिवसेनेनेही मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांना मंत्रिपद दिले, ते जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर डॉ. भामरे यांना मंत्रिपद मिळू शकलेले नाही. तथापि, युतीचे तीन मंत्री असताना लगतच्या जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते तथा जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना धुळे जिल्ह्याचीही जबाबदारी दिली गेली आहे. या संधीचे सोने करत भाजपच्या या प्रभावी आजी- माजी मंत्र्यांनी धुळे, शिंदखेडा, दोंडाईचा पालिका, शिंदखेडा पंचायत समितीत सत्ता स्थापन केली. कॉंग्रेसचा गड असलेल्या शिरपूर पालिकेत भाजपच्या नऊ नगरसेवकांनी प्रथमच प्रवेश केला. त्यामुळे भाजपची ही घोडदौड कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांसाठी चिंतेची ठरली आहे. 

कॉंग्रेसला नेस्तनाबूत करणार? 
लोकसभा निवडणुकीत डॉ. भामरे यांच्या रूपाने घवघवीत यश मिळविल्याने भाजपने उघडपणे "मिशन धुळे जिल्हा परिषद' हाती घेऊन पाचही विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीतून ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. असे असले तरी भाजपमधील वाढते इच्छुक उमेदवार आणि पूर्वीपासून तयारीला लागलेले या पक्षातील काही इच्छुक यांच्यातील स्पर्धा भाजप नेत्यांसाठी कमालीची डोकेदुखी ठरते आहे.

अशात आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे कॉंग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या हालचाली आहेत.

त्यांना अपेक्षित मतदारसंघांत भाजपने उमेदवारी दिली, सत्ताकेंद्र टिकवून ठेवण्यासाठी पाठबळ दिले, तर त्यांचे प्रवेश होऊ शकतील, असे मानले जाते. या संदर्भात उभयतांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तसे झाल्यास जिल्हा भाजपमय आणि विरोधकच न उरू देण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होताना दिसू शकतील. त्यातून कॉंग्रेसचा गड नेस्तनाबूत होईल. या विषयी आघाडीचे वरिष्ठ नेतेही कमालीचे धास्तावले आहेत. 

भाजप एकीकडे करिष्मा घडवीत असताना शिवसेनेसह नेते तथा पालकमंत्री भुसे जिल्ह्यात फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. शिवसेनेचे गटबाजीमुळे महापालिका आणि इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ घटत गेले. या सर्व घडामोडीत स्थानिक शिवसेनेने धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची जागा मागितली आहे. याउलट भाजपने पाचही मतदारसंघांतील जागा पदरात पाडू, असे सांगत शिवसेनेचे खच्चीकरण सुरू केल्याचे दिसते.

एकूणच या बदलत्या घडामोडींमध्ये जागांसह उमेदवार निवडीत मंत्री महाजन, मंत्री रावल, खासदार डॉ. भामरे आणि मंत्री भुसे यांचाच खरा कस लागणार आहे. त्यांनी उमेदवार निवडीचा चेंडू तूर्त 'सर्व्हे'कडे टोलवला आहे. शिंदखेड्याच्या जागावाटपावरून कॉंग्रेस आघाडीत वाद सुरू आहेत. 

लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धुळे मतदारसंघातील धुळे ग्रामीणमधून सरासरी 99 हजार, धुळे शहरातून 29 हजार, शिंदखेडा मतदारसंघातून 53 हजारांचे मताधिक्‍य भाजपला मिळाले. धुळे ग्रामीण, शिंदखेड्यात अपेक्षित मताधिक्‍य मिळाल्याने भाजपला हे मतदारसंघ "सेफ' वाटत आहेत. धुळे महापालिकेची सत्ता बहुमताने हाती येऊनही अल्प मताधिक्‍य मिळाल्याने भाजपपुढे ते आगामी विधानसभा निवडणुकीत वाढीसाठी बरीच आव्हाने आहेत. आदिवासीबहुल साक्री, शिरपूर मतदारसंघांत कॉंग्रेसची विजयाची परंपरा खंडित करण्यासाठी भाजपने डावपेचांची आखणी सुरू केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com