धुळ्यात 'उपस्थित' अधिकारी उपाशी, तर 'गायब' अधिकारी तुपाशी! - dhule district administration issues show cause notice to officers | Politics Marathi News - Sarkarnama

धुळ्यात 'उपस्थित' अधिकारी उपाशी, तर 'गायब' अधिकारी तुपाशी!

  निखिल सूर्यवंशी  
मंगळवार, 31 मार्च 2020

जिल्हा सर्वोपचार, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मनपाचे काही डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी गायब आहेत

धुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. याअंतर्गत केंद्र व राज्य सरकारला वेळोवेळी मागितलेली माहिती पुरविणे आणि दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची स्थानिक पातळीवर उपस्थित अनिवार्य आहे. मात्र, काही अधिकारी गायब असल्याने त्यांना जिल्हा प्रशासनाने आज कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला.
 
विविध कार्यालयांमध्ये उपस्थित काही अधिकारी उपाशी, तर गायब अधिकारी तुपाशी, अशी स्थिती आहे. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व कार्यालयप्रमुख आणि त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना तत्काळ उपस्थितीचा आदेश दिला आहे. पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांना रोज कार्यालयात उपस्थित राहाणे अनिवार्य आहे. त्यांना शासनाला माहिती पुरविणे आणि शासनाच्या आदेशाची व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश आहे. मात्र, जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावत उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाईचा इशारा दिला आहे. जळगाव, नाशिकपर्यंत "कोरोना'ने पाय पसरल्यावर हादरलेल्या जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

जिल्हा सर्वोपचार, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मनपाचे काही डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी गायब आहेत. त्यांना "पीपीई', मास्क, सॅनिटायझर पुरविणे आवश्‍यक आहे. तसेच डॉ. काशिनाथ चौधरी, डॉ. लिंगायत आदींसह अन्य काही डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात हजर होण्याचा आदेश दिला जावा. त्यांनी अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांच्या लेखी आदेशाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख