जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन, देवकरांसह सर्व दोषी:ताब्यात घेण्याचे आदेश 

राज्यभरात गाजलेल्या तत्कालीन जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांसह सर्व 48 आरोपींना धुळ्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्या. सृष्टी नीळकंठ यांनी आज दुपारी सव्वा वाजता हा निकाल देत सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले.
Gulabrao Deokar - Suresh Jain
Gulabrao Deokar - Suresh Jain

धुळे  : राज्यभरात गाजलेल्या तत्कालीन जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांसह सर्व 48 आरोपींना धुळ्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्या. सृष्टी नीळकंठ यांनी आज दुपारी सव्वा वाजता हा निकाल देत सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले.

त्यानुसार पोलिसांनीही सर्वांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे. जळगाव पालिकेच्या राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्याचा निकाल आज धुळ्याच्या विशेष न्यायालयात लागणार होता. त्यादृष्टीने स्थानिक पोलिस प्रशासनाने आवश्‍यक बंदोबस्त सकाळपासूनच तैनात केला होता. 

बचावपक्ष वकिलांची विनंती अमान्य 
दुपारी 12 वाजता न्यायालयाचे कामकाज सुरु झाले. न्या. सृष्टी नीळकंठ यांनी सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांना निकालापूर्वी भूमिका मांडण्यासाठी परवानगी दिली. बचाव पक्षाच्या वकिलांनी या गैरव्यवहार प्रकरणाशी त्यांच्या अशिलांचा संबंध नाही, असा दावा केला. अनेक संशयितांना आजार, व्याधी जडल्याचे कारण पुढे करत त्यांनी बचावाचा प्रयत्न केला. मात्र, सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी सर्व संशयितांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. जनतेचा पैसा हडपण्याच्या दृष्टीने त्यांनी हा प्रकार केला. हा केवळ गैरव्यवहार नव्हे तर पालिकेवर अक्षरश: अत्याचार केला आहे. जागा नसतानाही घरकुलाचा ठराव करणे, सर्व बेकायदेशीर असतानाही त्याबाबत प्रश्‍न न विचारणे हा अधिकारी व नगरसेवकांचा गुन्हा आहे. यापैकी अनेक संशयित जामीन न मिळाल्याने कारागृहात होते, त्यावेळी त्यांना कुठलाही आजार जडला नाही, त्यामुळे आत्ताच कशा व्याधी लागल्या? असे मुद्दे उपस्थित केले. 

सर्व आरोपी दोषी 
भूमिका ऐकल्यानंतर बचावपक्षाची विनंती अमान्य करत न्या. सृष्टी नीळकंठ यांनी सर्व आरोपींना दोषी ठरविले. तसेच स्थानिक पोलिसांना या सर्व दोषींना ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांनी या आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे. निकालाने काही आरोपींना मोठा मानसिक धक्का बसला असून महिला आरोपींच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागल्याचे चित्र होते. दुपारच्या सत्रात शिक्षेवर युक्तिवाद होऊन त्यांना शिक्षा सुनावली जाण्याची शक्‍यता आहे.  जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com