dhonde and dhas | Sarkarnama

पक्षांतर्गत संताप कसा रोखणार, धस यांची मदत कशी मिळविणार यावरच धोंडेंच्या विजयाचे गणित...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

तयारी करणाऱ्या जयदत्त धस यांच्याऐवजी भिमराव धोंडे यांना उमेदवारी मिळाल्याने धस समर्थक अस्वस्थ आहेत. भाजप सीट शंभर टक्के पडणार असा सोशल मिडीयावरील प्रचार अद्यापही थांबवलेला नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना रोखीने मदतही मिळायला सुरु झाली आहे. आपल्याला सर्वांचीच गरज असून साथ मिळणार असल्याचे ते भाषणांतून सांगत आहेत. 

बीड : आष्टी मतदार संघातून पुन्हा उमेदवारी मिळविण्यात भिमराव धोंडे यांना यश आले असले तरी पक्षांतर्गत त्यांच्या विरोधात असलेला संताप रोखणे आणि आमदार सुरेश धसांची मदत मिळविण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे. याच वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना प्रचार बैठकांमधून रोख मदतही मिळायला लागली आहे. त्यांनी तर सभा - बैठकांमधून आपल्याला सर्वांचीच गरज असून अनेकांची साथ मिळेल, अशी गुगली टाकून भाजपच्या गोटात अधिकच अस्वस्थता निर्माण केली आहे. 

आष्टी मतदार संघात भाजप व राष्ट्रवादी या पक्षाची कमी - अधिक ताकद असली तरी या दोन पक्षांप्रमाणेच भाजप आमदार सुरेश धस यांचेही स्वतंत्र नेटवर्क आणि ताकद आहे. दरम्यान, त्यांचे पुत्र जयदत्त धस या निवडणुकीसाठी तयारी करत होते. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपले इरादेही स्पष्ट केले होते. तर, सुरेश धस यांनी भिमराव धोंडे यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत " कोणालाही द्या मात्र धोंडे नको' अशी भूमिका घेतली होती. इथून भाजपचेही इतर स्पर्धक तयारीत होतेच. 

परंतु, उमेदवारीची माळ धोंडेंच्याच गळ्यात पडली. परंतु, धोंडेंना उमेदवारी मिळाली आणि धस समर्थकांच्या संतापाचा पारा चढला. थेट भाजप उमेदवार पडणार अशा आरोळ्या ठोकल्या गेल्या आहेत. उमेदवारी काढू नये यासाठी धस समर्थकांची जमलेली गर्दी आणि संताप पाहता आता पुढची वाट धोंडेंना सोपी नाही हेच यातून दिसते. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आबजे यांना प्रचार बैठकांमधून रोख मदतही मिळायला सुरु झाली आहे. तर, आपल्याला अनेकांची मदत मिळणार असल्याचे त्यांचे सूचक वक्तव्य धोंडे समर्थकांना अस्वस्थ करणारे आहे. आता धस समर्थकांचा संताप रोखणे आणि मदत पदरात पाडून घेणे धोंडेंना जमेल का, यावर पुढची वाटचाल अवलंबून आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख