नोकरी वाचविण्यासाठी सोडली सत्ता

नोकरी वाचविण्यासाठी सोडली सत्ता

राजगुरुनगर(जि.पुणे) : सत्तेपेक्षा रोजीरोटी महत्त्वाची मानून एका महिलेने पंचायत समिती सदस्यत्व सोडल्याची घटना खेड तालुक्‍यात घडली. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या धोंडाबाई साहेबराव खंडागळे यांनी आपली नोकरी वाचविण्यासाठी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. फेब्रुवारीत झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी बुद्रूक गणातून त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. 

धोंडाबाई खंडागळे या कोये गावाच्या भिसांबा- ठाकरवाडी या वस्तीवर अंगणवाडी सेविका आहेत. पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर नियमानुसार त्यांना अंगणवाडी सेविकापदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. निवडून आल्यानंतर सत्कार समारंभाचे आणि मानपानाचे नव्याचे नऊ दिवस संपले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि नियमित मिळणारे पाच हजार रुपये मानधन दोन महिने न मिळाल्याने, त्यांना चणचण जाणवली. त्यावरून त्यांनी भविष्यातील धोका ओळखला. सत्तेच्या पदापेक्षा रोजीरोटी महत्त्वाची असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आपला राजीनामा त्यांनी शुक्रवारी सभापती सुभद्रा शिंदे यांच्याकडे दिला. त्यावर साक्षीदार म्हणून पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर आणि अंकुश राक्षे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सभापतींनी राजीनामा स्वीकारून तो पुढील कारवाईसाठी तहसीलदार, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. पंचायत समिती सदस्य आणि अंगणवाडी सेविका अशा दोन्ही ठिकाणी कार्यरत राहणे नियमानुसार शक्‍य नसल्याने आपण पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. 
खंडागळे या पिंपरी बुद्रूक गणातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. या गणातून अनुसूचित जमातीतील पुरुषही निवडणूक लढवू शकत होते; पण सभापतिपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने सर्व पक्षांनी येथून अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवार दिल्या होत्या. खंडागळे निवडून आल्या; पण भाजपला पंचायत समितीत बहुमत नसल्याने शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे सभापती झाल्या. 
-------- 

सहा महिन्यांनी पोटनिवडणूक 
धोंडाबाई खंडागळे यांच्या राजीनाम्यामुळे खेड पंचायत समितीत एक पद रिक्त झाले आहे. त्या जागेसाठी आता सहा महिन्यांनी निवडणूक होईल. पंचायत समितीत शिवसेना ही कॉंग्रेसच्या एका सदस्याच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. या निवडणुकीत विजय मिळवून पूर्ण बहुमत मिळविण्याचा शिवसेना प्रयत्न करेल; तर भाजप आपली जागा राखण्याचा प्रयत्न करेल. त्यादृष्टीने भाजपने रामदास मेंगळे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भाजप प्रवेश करून घेतला आहे. मेंगळे यांच्या पत्नी बायजाबाई यांनीच राष्ट्रवादीच्या तिकिटावर धोंडाबाई खंडागळे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. 
------------------------------------------ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com