DHO Dr. Where did Amol Geete go with alcohol and Rs. Six lakh seventy thousand | Sarkarnama

डीएचओ डॉ. अमोल गीते दारू आणि पावणेसात लाख घेऊन कुठे निघाले होते..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 एप्रिल 2020

निलंबित डॉ. गीते यांच्या रिक्त जागेवर डॉ. सुधाकर शेळके यांच्याकडे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. डॉ. शेळके हे येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आहेत. पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कार्यभार अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

औरंगाबादः कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहेत, पाच बळी आणि चाळीस कोरोनाबाधित रुग्ण शहरात आढळल्यामुळे राज्य सरकारने औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये केलेला आहे. अशावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. अमोल गीते यांनी जे गांभीर्य आणि समयसूचकता दाखवायला हवी ती न दाखवता थेट जिल्हांबदी नियम मोडला. गाडीमध्ये महागड्या मद्याच्या दोन बाटल्या आणि ६ लाख ७० हजारांची रोख रक्कम घेऊन जालन्याकडे जात असतांना चेकपोस्टवर पोलीसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. डॉ. गीते यांच्या या प्रतापाबद्दल आधी त्यांच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्यांनतर निलंबनाची कारवाई. 

विशेष म्हणजे अशा आपत्तीच्या काळात मुख्यालय सोडू नये या साध्या नियमाची आठवण देखील त्यांनी ठेववली नाही. मुख्य कार्यंकारी अधिकाऱ्यांची परवनागी नाही, की जिल्हाबंदी असतांना ती ओलांडण्यासाठीचे ठोस कारण आणि परवाना नसतांना गीते यांनी हा आगाऊपणा का केला असा प्रश्न त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर पडला आहे.

 डॉ. गीते यांच्या बेजबादार वागण्यामुळे संपुर्ण आरोग्य यंत्रणाच हादरून गेली आहे. एकीकडे राज्याचे आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, संपुर्ण आरोग्य यंत्रणा, प्रशासन, पोलीस कोरोनाच्या संकटापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत, अशावेळी जिल्ह्याती आरोग्य आबाधित राखण्याची जबाबदारी असलेला जिल्हा आरोग्य अधिकारी इतका निर्ढावलेला कसा असू शकतो? याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच डॉ. गीतेंवर गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

डॉ. अमोल गिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून ‘एफआयआर’ची प्रत मिळताच त्यांचा कार्यभार काढून घेण्याचे ठरले आणि त्यानूसार प्रत हाती मिळतातच गीते यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेत येऊन धडकले. तसेच पुढील कारवाईची शासनाकडे शिफारस करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी स्पष्ट केले.

चक्क शासकीय वाहनात महागड्या दारूच्या बाटल्या आणि ६ लाख ७० हजारांची रोख रक्कम घेऊन जाताना पोलिसांनी डॉ. गिते यांना पकडल्याने आरोग्य यंत्रणेला या घटनेचा चांगलाच धक्का बसला आहे.  दरम्यान, सोमवारी (ता. २०) आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेत डॉ. गितेंसंदर्भात काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा करून त्यांचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश दिले होते.

डॉ. सुधाकर शेळके प्रभारी 

जिल्हा आरोग्य अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुधाकर सोन्याबापू शेळके यांच्याकडे देण्यात आला आहे. निलंबित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या रिक्तपदावर ही नियुक्ती करण्यात आली. आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांनी बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. तीन मेपर्यंत लॉकडाऊन आहे. या आपत्तीप्रसंगी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले पद रिक्त ठेवणे योग्य होणार नाही.

यामुळे निलंबित डॉ. गीते यांच्या रिक्त जागेवर डॉ. सुधाकर शेळके यांच्याकडे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. डॉ. शेळके हे येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आहेत. पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कार्यभार अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॉ. शेळके यांनी मूळ पदाची कर्तव्ये सांभाळून जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार तत्काळ स्वीकारावा असे आदेशात म्हटले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख