आजपासून माझ्यासाठी अमित भैय्या नव्हे साहेब! धीरज देशमुखांनी व्यक्त केल्या भावना

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यातील बंधुप्रेम लातूरकरांनी अनेकदा अनुभवले आहे. तेच प्रेम, तसाच जिव्हाळा अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या रूपाने लातूरकर पुन्हा एकदा अनुभवत होते
आजपासून माझ्यासाठी अमित भैय्या नव्हे साहेब! धीरज देशमुखांनी व्यक्त केल्या भावना

लातूर : लहान असताना पप्पांना (विलासराव देशमुख) आमचे काका (दिलीपराव) हे 'अण्णा' या नावाने हाक मारायचे. पण, पुढे काकांनी अण्णा म्हणायचं कधी सोडलं, हे कोणाला कळलंच नाही. राजकीय वर्तुळात वावरताना पप्पांना सगळेच 'साहेब'च म्हणायचे. मग काकाही आपसुकपणे पप्पांना साहेब म्हणू लागले. त्याच पद्धतीनं मीही भैय्याचा उल्लेख आजपासून 'अमित साहेब' असाच करीन, हे जाहीरपणे सांगतो... अशा शब्दांत आपल्या मोठ्या भावाबद्दल आमदार धीरज देशमुख भावना व्यक्त करत होते.

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यातील बंधुप्रेम लातूरकरांनी अनेकदा अनुभवले आहे. तेच प्रेम, तसाच जिव्हाळा अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या रूपाने लातूरकर पुन्हा एकदा अनुभवत होते. महाविकास आघाडीने अमित देशमुख यांच्यावर वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. यानिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार लातुरात करण्यात आला. लातूर ग्रामीण मतदार संघातून निवडून आल्याबद्दल धीरज यांचाही सत्कार झाला. यावेळी धीरज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

धीरज म्हणाले, या सोहळ्याला आल्यानंतर मला 1999चे दिवस आठवले. आजही तसाच ताफा, तसाच लोकांचा ओढा, लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंदही तसाच. 'आपला माणूस' मंत्री झाल्याची लोकांमध्ये भावना आहे... हे वातावरण पाहून मला पप्पांची (साहेबांची) आठवण झाली. पण, त्यांना आज मी मिस करत नाहीये. ते आजही आहेत. ते हा सत्कार सोहळा पाहत आहेत. अनुभवत आहेत. कारण इथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात, हृदयात, डोळ्यांत ते आहेत. तिथूनच ते आम्हाला आशीर्वाद देत आहेत, 'असेच चांगले काम करत रहा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचा. लोकांचे प्रश्न सोडवा'.

विधानसभेत नेहमी पप्पांचा भास होतो

"तुमचे प्रेम, तुमचा आशीर्वाद मिळल्यामुळेच मला विधानसभेत जाता आले. ज्या विधानसभेत पप्पांचा आवाज घुमला आहे, त्यांची भाषणे ऐकायला अनेक जाणकार यायचे, अशा विधानसभेत जाण्याची संधी मला जनतेने दिली. विधानसभेच्या पायऱ्या चढताना, तिथे वावरताना मला नेहमी पप्पांचा भास होतो. त्यांच्या सहवासात असल्याची जाणीव नेहमी होते. अशा ठिकाणी तुम्ही मला पाठवलात, हे क्षण मी कधीही विसरणार नाही. मी कायम आपल्या ऋणात राहीन", अशा भावना व्यक्त करीत धीरज म्हणाले, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेन. अशा प्रयत्नांतूनच मतदार संघाचा कायापालट करून दाखवेन, असा शब्द तुम्हाला देतो.

सगळं आम्हालाच, हा दुजाभाव नाही

जे जास्त काळ विरोधी पक्षात असतात, ते सत्तेत आल्यानंतरही विरोधकांसारखेच वावरतात. पण, जे सत्तेत आल्यानंतर सत्तेचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करतात, अशांना पुन्हा संधी मिळल्यानंतर ते संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाहीत. ती संधी लातुरसाठी पुन्हा एकदा चालून आली आहे. लोकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. जिल्ह्यातील सहापैकी आघाडीचे चार आमदार निवडून आले. तेथेही भेदभाव नाही. चारपैकी दोन काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादीचे आहेत. महाविकास आघाडीने मंत्री म्हणून दोघांना संधी दिली. त्यात एक काँग्रेसचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. सगळं आम्हालाच पाहिजे, असा दुजाभाव आमच्याकडे नाही, असेही धीरज यांनी आवर्जून सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com