क्षीरसागर, धस यांच्यावरील कारवाईबाबत मौनच

क्षीरसागर, धस यांच्यावरील कारवाईबाबत मौनच

बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडाचा फायदा उचलत भाजपने सत्ता हस्तगत केली. सर्वाधिक सदस्य असूनही राष्ट्रवादीला अध्यक्षपदासह सत्तेवर पाणी सोडावे लागले होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर कठोर टीका करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती. त्यावर राणाभीमादेवी थाटात अजित पवार यांनी गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा केली. त्यामुळे राष्ट्रवादीत आता जोरदार उलथापालथ होणार या आशेवर बसलेल्या अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होऊन दोन आठवडे उलटले तरी पक्षाकडून क्षीरसागर, धस यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. उलट आगामी महापालिका निवडणुकीसाठी जयदत्त क्षीरसागरांचे नाव पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करुन त्यांना पायघड्याच घातल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला यांचे नाव राष्ट्रवादीकडून निश्‍चित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सुरेश धस यांच्या पाच समर्थक सदस्यांनी भाजपला मदत केली आणि सोळंके यांचे अध्यक्षपदाचे स्वप्न भंगले. जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस व अक्षय मुंदडा यांच्यामुळेच जिल्हा परिषदेची सत्ता व राष्ट्रवादीची इभ्रत गेल्याचा आरोप करत या दोघांवर कठोर कारवाई करा नाही तर मी पक्ष सोडतो अशी भूमिका प्रकाश सोळंके यांनी घेतली होती. बीडमधील गद्दारीची दखल घेत खुद्द अजित पवार यांनीच कारवाईचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे सोळंके व त्यांचे समर्थक कारवाईची वाट पाहत होते. पण घडले उलटेच. कारवाई तर दूरच उलट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेल्या संघर्ष यात्रेत जयदत्त क्षीरसागर यांनाच पक्षाच्या वतीने पुढे करण्यात आले. हे कमी की काय म्हणून आता, मराठवाड्यातील लातूर, परभणी या दोन महापालिका निवडणूक प्रचारासाठी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत देखील जयदत्त क्षीरसागरांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाश सोळंकेंना पक्षाने तोंडघशी पाडल्याची चर्चा आहे. 
फेसबुकवरील कारवाईची धमकी "फेक' 
"बीडमध्ये पक्षद्रोह करणाऱ्यांवर कारवाई होणारच' अशी पोस्ट अजित पवारांना आपल्या फेसबुक पेजवर टाकली होती. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांवर कारवाई आणि तालुक्‍याचे नेतृत्व आपल्याकडे येणार या आनंदाने काकू - नाना आघाडीला उकळ्या फुटल्या. होत्या. पण घडले वेगळेच. एकीकडे पक्षाने संदीप क्षीरसागरांना काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात हवा देत मदत घेतली आणि दुसरीकडे पक्षात जयदत्त क्षीरसागरांनाच स्थान असल्याचे कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे अजित पवारांनी फेसबुकवर टाकलेली कारवाईची पोस्ट "फेक' होती अशी चर्चा आता राष्ट्रवादीमध्ये रंगू लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com