धर्मा पाटील तुमचं चुकलचं! 

सरकारी वीज प्रकल्पासाठी तुमची चार एकर जमीन गेली. तुमच्या जमिनीला चार लाख रूपये मिळाले आणि शेजारच्या जमिनीला म्हणे चार कोटी रूपये! तुमच्या जमिनीवर सहाशे आंब्यांची झाड होती. त्याचीही किंमत मिळाली नाही. जमीन बागायती होती. तरीही तुम्हाला ती सरकारला द्यावी लागली. या जमिनीला एवढा कमी मोबदला का मिळाला, असा तुम्हाला प्रश्‍न पडला. त्यासाठी तुम्ही मंत्रालयापर्यंत भांडत होता. मंत्रालयाच जाऊन न्याय मिळतो, हे तुम्हाला कोणी सांगितल होतं? खालच्या खालीचं सगळं मॅनेज करायचं होतं.
धर्मा पाटील तुमचं चुकलचं! 

शेतकरी धर्मा पाटील तुमचे चुकलचं! चार एकर जमिनीच्या मोबदल्यासाठी तुम्ही मंत्रालयात विषाचा प्याला ओठाला लावला. काय कारण होतं तुम्हाला असं करण्याचं? तुम्हाला सरकार कसं काम करतं हे माहीत नव्हत का? तुमचं वय 84 वर्षे होतं. म्हणजे तुमचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी असेलल्या ब्रिटिश सरकारच्या काळातला. अहो हे सरकार नावाची गोष्ट तेव्हापासून तशीचं आहे. काहीच बदल नाही. तुम्ही वयानं ज्येष्ठ होता. तुम्हाला हे माहीत हवं होतं.

सरकारी वीज प्रकल्पासाठी तुमची चार एकर जमीन गेली. तुमच्या जमिनीला चार लाख रूपये मिळाले आणि शेजारच्या जमिनीला म्हणे चार कोटी रूपये! तुमच्या जमिनीवर सहाशे आंब्यांची झाड होती. त्याचीही किंमत मिळाली नाही. जमीन बागायती होती. तरीही तुम्हाला ती सरकारला द्यावी लागली. या जमिनीला एवढा कमी मोबदला का मिळाला, असा तुम्हाला प्रश्‍न पडला. त्यासाठी तुम्ही मंत्रालयापर्यंत भांडत होता. मंत्रालयाच जाऊन न्याय मिळतो, हे तुम्हाला कोणी सांगितल होतं? खालच्या खालीचं सगळं मॅनेज करायचं होतं. 

तुमच्या आंब्याच्या झाडांच्या नोंद घेतली गेली नव्हती. मग तुम्ही तलाठ्याचे हात का ओले केले नाही? एका झाडामागे त्या बिचाऱ्याने फक्त दोन-तीन हजार रूपये घेतले असते. अहो ही तलाठी जात इतकी दयाळू असते की तुमच्या शेतात आंब्याची झाडं नसती तरी त्याने नोंद करून दिली असती. त्यासाठी तुम्हाला एका झाडाला पाच हजार रूपये खर्च आला असता. तुमचाही त्यात फायदा झाला असता. तुम्ही उगीच जिवाचा त्रागा करून घेतलात.

त्या तलाठ्यानं तुम्हाला पुढं आणखी मदत केली असती. तुमची जमीन बारा महिने बागायत आहे, हे दाखवून त्याने भाव वाढवून दिला असता. तिथला भूसंपादनचं काम करणारा अधिकारी तुमच्या मदतीला आला असता. त्याला थोडाफार वाटा दिला असता तर त्यानं तुमच्या जमिनीचा भाव वाढवून दिला असता. काही अधिकारी इतके सहकार्य करत असतात की त्यांनी तुमची जमीन 50 लाखाला विकत घेतली असती. तुमची सगळी धावपळ थांबली असती. तुम्हाला घरपोच रक्कम त्याने आणून दिली असती. त्या अधिकाऱ्याने मग त्याच्या मेव्हण्याच्या, मित्राच्या नावावर जमीन खरेदी करून त्या मेव्हण्याला भूसंपादन कायद्यातून चार कोटी मिळवून दिले असते. आता त्याने आधी 50 लाखांची गुंतवणूक केल्यावर त्याला थोडाफार परतावा मिळायला नको का? पण तुम्ही स्वतःच भांडायचं ठरवलं आणि होत्याचं नव्हतं झालं की नाही? 

तुमचा सरकारी अधिकाऱ्यावर विश्‍वास नव्हता? त्यावरही मार्ग होता. एखादा पांढऱ्या खादीवाला नेता भूसंपादन किंवा पुनर्वसन विभागात हिंडताना तुम्हाला दिसला नव्हता का? अहो हे असले नेते जनतेच्या सेवेला तत्पर असतात. त्यानं चुटकीसरशी तुम्हाला चांगला मोबदला मिळवून दिला असता. अगदी तुम्ही म्हणाल तेवढ्या कोटींचा! फक्त त्याच्या 50 टक्के त्याला द्यावी लागली असती. आता तुम्ही तुमच्या मोबदल्यासाठी एवढी पायपीट केली होती. किती कष्टाचं काम आहे, हे तुम्हाला कळालं होतचं. आता त्या जनसेवकानं 50 टक्के रक्कम घेतली तर कुठं चुकलं? पांढऱ्या खादीचा खर्च फार असतो. तुम्हाला हे माहीत नव्हतं का? 

तुम्ही गाव सोडलं. जिल्हा सोडला. थेट मुंबईत मंत्रालयात आला. येण्यापूर्वी थोडी माहिती घ्यायची होती. महसूल खात्यातील अव्वर, अप्पर अशा दर्जाचे अधिकारी असतात. ते निब्बर असतात वरनं. पण आतून असतात सशाच्या काळजाचे. त्यांना थोडी लालूच दाखवली की बिचारे करतात मदत. सरकारने असे अधिकारी नेमून जनतेवर किती उपकार केलेत! त्या अधिकाऱ्याला देण्यासाठी नोटांची पुडकी घेऊन जायची होती. पण तुम्ही विषाची बाटली घेऊन गेला. ही बाटली स्वतःच पिलात. 

तुम्हाला वाटलं की सरकार बदललयं. अनेक लाभार्थींचे फोटो तुम्ही रोज पाहत होता. नवीन चेहऱ्यांचं मंत्रिमंडळ असल्याचं तुम्हालाही दिसत होतं. पण तिथचं तुमची फसवणूक झाली. चेहरे बदलले तरी खुर्च्या त्याच राहतात. सरकार बदलून शेतकऱ्यांच पुनर्वसन नाही होतं. तुमच्या त्या साध्या पिशवीतील कागदपत्रं पाहायला वेळ कोणाला होता? सरकार बदललं की नेत्यांचं पुनर्वसन होतं, शेतकऱ्यांच नाही, हे तुम्हाला कळालं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. तुम्ही धीर धरलाच नाही. थेट विषाची बाटली तोंडाला लावली. 

तुमच्या विष पिण्यावरून इकडं किती राजकीय वातावरण पेटलं हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तेव्हा किती बडी मंडळी तुमच्या भेटीसाठी आली होती. तरी तुम्हाला जाग आली नाही. जे भेटायला येत होते ते पण कधी काळी सरकारमध्ये होते. मात्र त्यांच्याही कानापर्यंत तुमची तक्रार कधी गेली नव्हती. त्यांच्या सरकारच्या काळात तुम्ही मंत्रालयात आला असता तर तुम्हालाही विषाची बाटली जवळ करावी लागली नसतीच, असंही नाही. तरीही मंडळी तुमच्या भेटीला नित्यनेमाने येत होती. ही मंडळी विरोधी पक्षात असल्याने तुमच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल सरकारवर गुन्हा दाखल करायची मागणी करत होते.

ही मागणी ऐकून तरी तुम्ही उठायचं होतं. रुग्णालयातून बाहेर पडायचं होतं. पण तुम्ही आम्हाला सोडून गेलातं. का असं केलं? तुम्हाला माहिती आहे का, या सिस्टिमने असे किती धर्मा पाटील पचविले आहेत? अशा अनेक नावांत तुमचीही एक नोंद होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हवा होता.  सरकार नवं असो की जुनं? अन्याय तर काय चालूच असतो.  तुम्हाला तो सहन झाला नाही म्हणून तुम्ही जीव दिला. या सरकारी सिस्टिमवर तुमच्या मृत्युचा साधा ओरखडाही उमटणार नाही. इतकी ती निबर झाली आहे. म्हणून धर्मा पाटील तुमचं चुकलचं! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com