dharavi and cm of maharashtra | Sarkarnama

धारावी पुर्नविकासाची "हीच ती वेळ' धारावी पुर्नविकास समितीकडून मुख्यमंत्र्यांना आश्‍वासनाची आठवण...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

राज्य सरकारने रेल्वेकडून 45 एकर जमिन खरेदीने अधिग्रहित केली आहे. जमिनीवरून निर्माण केलेला वाद संपुष्टात आणून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते. ते शब्द पाळणारे आहेत. त्यामुळे ते निश्‍चीतच धारावीच्या पुर्नविकासाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देतील असे देखील कोरडे यांनी सांगितले. 

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्प रखडण्यास सरकारमधीलच काही झारीतील शुक्राचार्य कारणीभूत आहेत.त्यांच्यामुळेच धाराविकरांना गेल्या 16 वर्षांपासून नरकयातना भोगाव्या लागत असल्याचा आरोप धारावी पुनर्विकास समितीने केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धारावीकारांना पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचं आश्वासन दिलं होतं.ते आश्वासन पाळण्याची 'हीच ती वेळ' असल्याचे सांगत पुनर्विकासाचे काम मार्गी लावावे अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीने केली.मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाही तर पुढील निर्णय घेणार असल्याचा इशारा ही समितीने दिला आहे. 

धारावीचा पुर्नविकास करावा म्हणून धारावीकर गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहेत.मात्र तत्कालीन सरकारने धारावीकरांची मागणी पूर्ण केलेली नाही.परंतु आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हा प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा धारावी पुर्नविकास समितीचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र कोरडे यांनी व्यक्त केली. धारावी पुर्नविकास प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे यासाठी 20 हजार झोपडीधारकांच्या सहयांचे निवेदन नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले होते. त्यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केली होती.यावेळी ठाकरे यांनी धारावीकरांच्या मागण्यांचा विचार करू असा शब्द दिला आहे.तो आता ते पाळतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. धारावीच्या पुर्नविकासाची हीच ती वेळ असल्याचे सांगून त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर विश्वास असल्याचे सांगितले. 

राज्य सरकारने रेल्वेकडून 45 एकर जमिन खरेदीने अधिग्रहित केली आहे. जमिनीवरून निर्माण केलेला वाद संपुष्टात आणून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते. ते शब्द पाळणारे आहेत. त्यामुळे ते निश्‍चीतच धारावीच्या पुर्नविकासाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देतील असे देखील कोरडे यांनी सांगितले. 

राज्य सरकारने 4 फेब्रुवारी 2004 रोजी जीआर काढत या प्रकल्पाच तांत्रिक काम सुरू केलं होतं. प्रारंभी या प्रकल्पाची किंमत 5600 कोटी ठरवण्यात आली होती. आजमितीस ती अंदाजित 27 हजार कोटीवर जाउन पोहचली आहे.यासाठी अनेकदा जागतिक स्तरावर निवीदा काढण्यात आल्या.मात्र पुर्णत्वास जाउ शकल्या नाहीत.गेल्या 15 वर्षापासून हा प्रकल्प रखडला आहे असे सांगून त्यांनी धारावीकरांनी किती काळ वाट पाहायची असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. धारावीकरांना 400 चौ.फु.घर मिळवून देणारच असा शब्द उध्दव ठाकरे यांनी धारावीकरांना दिला होता.आता प्रकल्प सुरू करण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगून ते या प्रकल्पाची कार्यवाही तातडीने करतील अशी अपेक्षा कोरडे यांनी व्यकत केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख