`पाॅलिटिकली हेवी वेट` धनंजय मुंडेंनी घटविले 18 किलो वजन! - dhanjay munde reduces his weight by 18 kilo | Politics Marathi News - Sarkarnama

`पाॅलिटिकली हेवी वेट` धनंजय मुंडेंनी घटविले 18 किलो वजन!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 एप्रिल 2019

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन वाढू लागले. त्यासोबत त्यांचे शारीरिक वजनही शंभरी गाठण्याच्या मार्गावर होते. वजन हाताबाहेर जात असल्याच्या लक्षात येताच त्यांनी लगेच त्यावर लक्ष दिले आणि 80 किलोच्या आत आणले. 

पुणे : निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांचे आपल्या भाषणाकडे, मतदारांकडे, विरोधकांच्या वक्तव्याकडे लक्ष असते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी हे सारे सांभाळत आपल्या फिटनेसकडेही लक्ष दिले. त्यातून त्यांनी गेल्या चार महिन्यांत 18 किलो वजन घटविले आहे.

ऐन निवडणुकीच्या व्यस्त दौऱ्यातही फिटनेसकडे दुर्लक्ष न करता त्यांनी आपले वजन 95 किलोवरून 77 किलोवर आणले आहे. मुंडेंचे वजन शंभरी गाठण्याच्या मार्गावर असतानाच त्यांनी त्यातील धोका ओळखला आणि त्यांनी ते कमी करण्यासाठी मग तातडीने पावले उचलली. त्यांनी खरोखरची पावले उचलत रोज किमान आठ किलोमीटर चालण्याचा दिनक्रम सुरू केला. त्यात तीन किलोमीटर अंतर धावणेही सुरू केले.

घाईच्या वेळापत्रकामुळे सकाळी चालणे अनेकदा होत नाही. त्यामुळे बहुधा ते रात्रीच चालतात. सध्या निवडणुकांचे दौर सुरू आहेत. रोज तीनशे ते चारशे किलोमीटरचा गाडीने किंवा हेलिकाॅप्टरने प्रवास होतो. रात्रीची सभा संपल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाताना मग गाडीतून उतरून आठ किलोमीटर रस्त्याने पायी चालतात. एखाद्या हमरसस्त्यावर रात्री पोलिसाची गाडी मागे संथ चाललेली... त्यापुढे काळ्या सफारीतील काही पोलिस आणि त्यापुढे एखादा टी शर्ट घातलेला पायी चालतान दिसत असेल तर ते मुंडे आहेत म्हणून समजावे. इतका काटेकोरपणा त्यांनी यात ठेवला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार राजू शेट्टी हे सध्या `दीक्षित पॅटर्न`च्या प्रेमात त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवले आहे. मुंडे यांनी आपला स्वतःचा पॅटर्न तयार केला आहे. त्यांचा भर सोयाबीनवर जास्त आहे. सोयाबीनची भाकरी ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात घेतात. ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ हे त्यांनी आहारातून जवळपास बंद केले आहेत. उकडलेले मासे, फळे यावर जास्त भर देत आहेत.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की सध्या रोज चार ते पाच सभा होतात. मात्र अजिबात थकवा जाणवत नाही. वजन कमी झाल्याने हलकेही वाटते आहे. व्यायामात नियमितपणा ठेवल्याने दिवसभर उत्साह राहतो. वजन यापुढे वाढू न देणे आणि `एन्ड्युरन्स` वाढविण्यावर भर ठेवला आहे.    

     

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख