सहा नाही तर दीड डझन मंत्र्यांची हकालपट्टी करा : धनंजय मुंडे

सहा नाही तर दीड डझन मंत्र्यांची हकालपट्टी करा : धनंजय मुंडे

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमधुन भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे सहा मंत्री वगळण्यात आले आहेत. केवळ सहा मंत्र्यांना वगळून चालणार नाही तर भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या दीड डझन मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढुन टाकायला हवे. प्रकाश महेतांसारख्या बाराशे कोटी रूपयांच्या एफएसआय घोटाळा केलेल्या मंत्र्यांना केवळ वगळून चालणार नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना आज केली.

 सोमवारपासुन सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, नसीम खान, शेकाप नेते गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

राज्यातील निष्क्रिय, असंवेदनशील, भ्रष्टाचारी, शेतकरीविरोधी सरकारचा निषेध करून मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर संपुर्ण विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. 

धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या 5 वर्षात राज्यात कसलाही विकास झाला नाही. या सरकारने केवळ विकासाचा आभास निर्माण केला, जनतेला फसविणारे हे आभासी सरकार आहे. राज्यात सन 1972 पेक्षा भीषण दुष्काळ असताना मुख्यमंत्री आणि सरकारचे मंत्री राज्यात कुठेच दिसले नाहीत. दुष्काळात आम्ही गावोगावी फिरलो परंतु, सरकारी उपाययोजनांचा अभाव दिसला. मुख्यमंत्र्यांनी एसी केबीनमध्ये बसुन दुष्काळाचा आढावा घेतला, तर शिवसेना पक्षप्रमुखांनी विदेशी दौऱ्यावर सुट्टी घालवणं पसंत केलं. आता अधिवेशनाच्या तोंडावर यांना दुष्काळाची आठवण आली असल्याचा टोला लगावला.

राज्यात दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पेरणी व पुर्वमशागतीसाठी हेक्टरी 25 हजार रूपये मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे. रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आल्याने बेरोजगार तरुणांना भत्ता दिला पाहिजे,  अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

राज्यात उद्योगाची बिकट परिस्तिथी आहे. “गिफ्ट” सिटी, डायमंड मार्केट, कपडा मार्केट सारखे उद्योग आणि व्यापार गुजरात राज्यात गेले. राज्यात उद्योगवाढीचाही केवळ आभास निर्माण केला जात आहे. गेल्या निवडणुकीपुर्वी धनगर आरक्षणाचा आभास निर्माण केला, आज पाच वर्ष झाली तरी आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षणाचा गुंता कायम आहे. मुस्लीम व इतर आरक्षणांचे प्रश्न कायम आहेत ही जनतेची फसवणुक आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, सरकारवर सातत्याने न्यायालय ताशेरे ओढत असुन ही सरकार आणि मुख्यमंत्र्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. 

राज्य शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेत घातलेला गुणांचा गोंधळ गरीब आणि गुणवंत विध्यार्थ्यावर अन्याय करणारा आहे. हा विषय सभागृहात उपस्थित करून राज्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देऊ असे ते म्हणाले.

मोदी लाटेच्या हवेत निवडून आलेले हे सरकार भ्रमात गेले असून आभासी सरकारचे उडालेले विमान जमिनीवर आल्या शिवाय राहणार नाही. प्रशासकीय आणि पोलीस बलाच्या जोरावर लोकशाही व्यवस्थेवर दबाव टाकणे आणि विरोधी पक्षात फोडाफोडी करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. फोडाफोडीचे राजकारण करण्यासाठी मंत्रीमंडळात नवे खाते काढुन गिरीष महाजन यांना त्याचे मंत्री करा, असा उपरोधीक टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com